पुणे - आशा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मागण्या ऐकूनही घेतल्या नाहीत, याचा आपण निषेध करतो, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते पुण्यात बोलत होते. शुक्रवारी (आज) पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात भारतीय जनता पार्टी आशा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. अन्यायाच्या विरोधात बोलता कामा नये, असे या सरकारचे धोरण आहे. कोणीही आंदोलन केले की लगेच गुन्हे दाखल करायचे, लाठीचार्ज करायचा असे चालू आहे. ज्या आशा कर्मचाऱ्यांनी जिवावर उदार होऊन गेली दीड वर्षे कोरोनाच्या साथीत काम केले, त्यांच्या मागण्या उपमुख्यमंत्र्यांनी गाडीत बसून ऐकून तरी घ्यायला हव्या होत्या. पण ‘हम करे सो कायदा’, असे चालू आहे. याचा आपण निषेध करतो. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात या प्रश्नावर भाजपा सरकारला धारेवर धरेल, असेही पाटील म्हणाले.
'...तर भाजपा कार्यकर्तेही सक्षम'
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. राऊत यांनी वाफ दवडू नये, भाजपा कार्यकर्ते देखील पक्षासाठी, मोदींसाठी, रामासाठी काहीही करतील, असे पाटील म्हणाले. शिवसेना कार्यकर्ते राडे करतील तर त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात त्यांचे सरकार असल्याने शांतता राखण्याची जबाबदारी शिवसेनेची असल्याची जाणीव कार्यकर्त्यांना करून दिली आहे. आता हा विषय संपायला हवा असे आम्हालाही वाटते. तरीही शिवसैनिकांना असाच संघर्ष चालू ठेवायचा असेल तर भाजपाचे कार्यकर्ते सक्षम आहेत, असे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी महानगरपालिकांची वॉर्ड रचना करताना शहराच्या विकासाचा विचार करायला हवा. राज्य सरकारने कोणतीही रचना आगामी निवडणुकीत आणली तरी भारतीय जनता पार्टीला फरक पडत नाही. भाजपाची संघटनात्मक रचना बळकट आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा -आशा स्वयंसेविकांनी संप मागे घ्यावा, शरद पवारांचे आवाहन