पुणे - विधानसभेत सोमवारी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर आज राज्यात ठिकठिकाणी भाजपच्यावतीने राज्य सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. पुण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, राज्य सरकारमध्ये असलेल्या ओबीसी नेत्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. छगन भुजबळ हे स्वतःला ओबीसी समाजाचे नेते म्हणून घेतात, ओबीसी समाजाच्या मतावर ते निवडून येतात. परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी त्यांचा काहीही उपयोग होत नाही. या सरकारवर ते दबाव आणू शकत नाहीत. ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासाठी हे सरकार अपयशी ठरले. या सरकारमध्ये छगन भुजबळ हे तर सर्वात अपयशी ठरलेले आहेत. भाजपविरोधात बोलण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही. भाजपच्या कुठल्याही आमदाराने शिवीगाळ केली नाही. आमदारांवर लावलेले आरोप सपशेल खोटे आहेत. त्यामुळे आमदारांचे निलंबन नियमबाह्य असल्याचा आरोप करत हे निलंबन मागे घेण्यात यावे अशी मागणीही मुळीक यांनी यावेळी केली.