पुणे - ससून रुग्णालयातील कोविड विभागात गेली सहा महिने जीवावर उदार होऊन, कुटुंबाची काळजी न करता अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना सुरू असलेली निवास आणि भोजन व्यवस्था पूर्ववत करावी. या मागणीसाठी शहर भाजपने ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याना भोजनाचे पॅकेट वाटप करून अभिनव आंदोलन केले. यावेळी मागण्यांचे निवेदन ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे देण्यात आले.
कोरोनाच्या महामारीत गेल्या सहा महिन्यांपासून ससून रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी काम करत आहेत. गंभीर रुग्णांवर ते उपचार करत असतात. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची अधिक भीती असते. त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबावरही भीतीचे सावट असते. म्हणून या कर्मचाऱ्यांच्या निवासाची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था होणे आवश्यक आहे. परंतु निधी उपलब्ध नाही म्हणून या व्यवस्था करता येत नाही ही ससून रुग्णालय व शासनाची भूमिका चुकीची आणि निषेधार्थ आहे. या कोविड योद्यांना तातडीने पूर्वापार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सरकारला जमत नसेल तर तसे स्पष्ट करावे. पुणेकरांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या कोरोना योध्यांसाठी लागेल तितके दिवस भोजन देण्याची दानत पुणेकरांमध्ये नक्कीच आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा भारतीय जनता पक्षाला आंदोलन करावे लागेल असा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला. ज्यांच्या बळावर आपले पुणे शहर कोरोनाची लढाई लढत आहे, त्यांच्यावर अन्याय करणारी इतकी काटकसर बरी नव्हे उद्धवजी असा टोलाही मुळीक यांनी लगावला.
यावेळी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, सरचिटणीस गणेश घोष, दत्तात्रय खाडे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून शासनाची अकार्यक्षमता, असंवेदनशीलता आणि पुणे शहराला देत असलेल्या सापत्न वागणुकीचा तीव्र निषेध केला.