पुणे - राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांची आणि विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. याचा फटका पुस्तक विक्रीवर आणि पर्यायाने पुस्तकांच्या छपाईवर बसला ( Balbharati book printing decline ) आहे. मराठी शाळांचा टक्का घटल्याने बालभारतीच्या पुस्तक छपाईवरही त्याचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. दरम्यान, शाळेचा टक्का कमी होणे हेच मुख्य कारण असू शकत नाही अशी माहिती देखील बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बालभारतीतर्फे प्रकाशित करून मोफत वितरित आणि बाजारात विक्रीसाठी दिल्या जाणाऱ्या पुस्तकांच्या छपाईत तीन वर्षात जवळपास ५० टक्के घट झाली आहे.
काय सांगते आकडेवारी? - राज्य सरकार तर्फे राबविण्यात येणाऱ्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप केले जातात. आता त्यात देखील घट झालेली पाहायला मिळत आहे. जर मागच्या आणि या वर्षीचा विचार केला तर विद्यार्थ्यांना मोफत वाटप होणाऱ्या पुस्तकांची संख्या मागच्या वर्षी पेक्षा ८ लाख ९९ हजाराने कमी झाली आहे. त्याचबरोबर बालभारती खुल्या बाजारात विक्रीसाठी देखील मोठ्या प्रमाणात पुस्तके पाठवत असते. पण मागच्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा देखील कमी झालेला पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी खुल्या विक्रीकरता बाजारात २ कोटी ६३ लाख ३१ हजार ५०० पुस्तकांची मागणी होती. त्यानुसार सर्व पुस्तके छापण्यात आली होती; परंतु, यंदा बालभारतीने खुल्या विक्रीसाठी केवळ ५९ लाख १५ हजार पुस्तकांची छपाई केली आहे.
ही आहेत मुख्य कारणे - गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मराठी शाळेचा टक्का मोठ्या प्रमाणत कमी होत जात आहे. मराठी शाळांमधली विद्यार्थी संख्या देखील कमी होत चालली आहे. हेच मुख्य कारण आहे की, ज्यामुळे मराठी पुस्तकांच्या छापाईवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा या ऑनलाईन पद्धतीनेच सुरू होत्या. हे देखील एक यामागच मुख्य कारण मानले जात आहे. तसेच या कारणांसोबतच शाळेतून विद्यार्थ्यांची होणारी गळती, त्यानंतर आंतरराज्य स्थलांतर आधीच्या पुस्तकांचा शिल्लक राहिलेला साठा हे देखील यामागची कारणे असल्याची माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा - Santoor Maestro Pandit Shivkumar Saharma : संतूर वाद्याला जगमान्यता मिळवून देणारे 'पंडित शिवकुमार शर्मा'