पुणे - विवाहित महिलेच्या पतीशी अनैतिक संबंध ठेवून तिच्या संसारात ढवळाढवळ करत महिलेला अश्लिल शिवीगाळ तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. त्याशिवाय पतीकडून तिचा छळ केल्याच्या आरोपावरून करुणा मुंडे/शर्मा हिच्यासह दोघांवर पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये ( Yerawada Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 23 वर्षीय महिलेने पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार करुणा आणि महिलेचा पती यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
करुणाशी प्रेमसंबंध पत्नीचा छळ - फिर्यादी व त्यांचे पती हे उस्मानाबाद येथे रहायला होते. त्यांना एक मुलगी आहे. नोव्हेबर २०११ मध्ये त्यांच्या पतीची ओळख करुणा शर्मा हिच्याबरोबर झाली. ती स्वत:ची ओळख करुणा मुंडे अशी करुन देत असे. फिर्यादीचे पती वारंवार तिच्या घरी जाऊन राहू लागले. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. सतत करुणा शर्मा हिच्याशी बोलत असत. हे प्रकरण फिर्यादी पत्नीच्या लक्षात आल्यानंतर तिने विचारणा केल्यावर त्याने माझे करुणा मुंडेशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. त्यानंतर तो त्यांचा छळ करू लागला, असा आरोप पत्नीने केला आहे.
करुणा मुंडेकडून फिर्यादीला शिविगाळ - फिर्यादी पत्नी हिने पतीला फोन केल्यानंतर करुणा मुंडेही फोन उचलत असे तसेच तक्रारदार यांना शिवीगाळ करून पतीचा नाद सोड असे म्हणत असे. तसेच त्याला त्रास दिला तर महागात पडेल, अशी धमकी देत होती. तर आम्ही लग्न करणार आहोत. तू नाद सोड. मी पार्टी प्रेसिडेंट आहे, अशा धमक्या देऊन घटस्फोट देण्यासाठी वारंवार धमकावले असल्याचे फिर्यादी तक्रारीत म्हटले आहे.
जातीवाचक शिवीगाळ - पतीने फिर्यादी पत्नीला एका कार्यक्रमात नेले असता त्यावेळी करुणा मुंडेने हॉकीस्टीकने धमकावत जातीवाचक शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली, असा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशन येथे करुणा शर्मा आणि फिर्यादीच्या पती विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.