पुणे - मान्सूनच्या वर्षावानंतर आता मावळ तालुक्यातील परिसरात सर्वत्र हिरवी चादर पसरल्याचे दिसत आहे. अगोदरच निसर्गाने मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केलेला हा परिसर पावसानंतर आता अधिकच सुंदर दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका आणि परिसर हा इंद्रायणी भातासाठी विशेष ओळखला जातो. येथील बहुतांश शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली असून सर्व परिसर अगदी हिरवा शालू नेसल्यासारखा दिसत आहे.
मावळ तालुक्यातील कोणत्याही भागात आता जिकडे नजर फिरवू तिथपर्यंत फक्त असाच हिरवेगार रान बहरल्याचे दृश्य दिसत आहे. धुक्यात हरवलेले डोंगर, परिसरातून वाहत जाणारी इंद्रायणी नदी आणि उतर ओहोळ, धो-धो कोसळणारा पाऊस यामुळे डोंगर कड्यांवरुन कोसळणारे धबधबे, यांमुळे या परिसराचे रुप अधिकच खुललेले दिसत आहे.
हेही वाचा... २१ जूनला मुंबईतून खंडग्रास, तर कुरुक्षेत्रावरून दिसणार कंकणाकृती सूर्यग्रहण
मावळ हा परिसर हा भात शेतीसाठी ओळखला जातो. येथील अनेक शेतकरी इंद्रायणी या भाताची तसेच इतरही जातीच्या भाताचे उत्पन्न घेतात. दरम्यान, परिसरात मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे पुण्याजवळचा हा परिसर आता अधिकच सुंदर दिसत आहे.
![area of mawal taluka look more beautiful and green after rain](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/7698269_a.jpg)
मध्यनंतरी निसर्ग चक्री वादळाने या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. मात्र, निसर्गाच रुद्र रुप पाहून झाल्यानंतर त्याच्या कृपेने लोभस आणि तितकेच नयनरम्य रूप परिसरात दिखत आहे. मावळ परिसरात अनेक पर्यटनस्थळे असून पावसाळ्यात विशेष पर्यटनासाठी येत असतात. परंतु, यावर्षी कोरोनामुळे पर्यटनाला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडून बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे मावळ परिसरातील निसर्गाचे रूप पाहायला अनेक पर्यटक मुकणार आहेत.