पुणे - देशभरात गाजलेल्या क्रिप्टो करन्सी या आभासी चलनाच्या ( बिटकॉईन ) प्रकरणात पुणे पोलिसांनी तत्कालीन सायबर एक्सपर्ट म्हणून काम करणाऱ्या दोघांना काल ( शुक्रवार ) राहत्या घरातून अटक केली ( Pune Police Arrest Cyber Expert ) आहे. पोलिसांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आभासी चलन स्वतः घेतल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, दोन्ही सायबर तज्ञ तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्याचे बोलले जात आहे.
पंकज प्रकाश घोडे (रा. ताडीवाला रोड) तसेच रविंद्र प्रभाकर पाटील (रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीसह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपींच्या घरी देखील झाडाझडती
पुणे पोलिसांनी दोघांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. मध्यरात्री त्यांना पकडल्यानंतर घर तसेच ऑफिसची झडती घेण्यात आली आहे. या तपासात पोलिसांच्या हाती काय लागले हे समजू शकलेले नाही.
काय आहे नेमकं प्रकरण
पुण्यात क्रिप्टो करन्सी या आभासी चलनात ( बिटकॉईन ) गुंतवणूक करण्याच्या अमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार २०१८ मध्ये उघड झाला होता. याप्रकरणी दत्तवाडी व निगडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल होते. गुन्हा हा तांत्रिक असल्याने पोलीस अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी व आरोपींकडून संबंधित मालमत्ता जप्त करण्यासाठी सायबर तज्ञांची गरज होती. त्यात ग्लोबल ब्लॉकचेन फाऊंडेशनतर्फे पंकज घोडे व के.पी.एम.जी. तर्फे रविंद्र पाटील यांना नेमण्यात आले होते.
अप्पर महासंचालकांकडून चौकशी करण्याचे आदेश आल्यानंतर पुणे पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या. तत्पूर्वी या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी १७ जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून काही बिटकॉईन व क्रिप्टो करन्सी जप्त केली होती. तत्कालीन अधिकाऱ्यांनी जप्त केलेला डाटा हा विश्वासाने या दोघांकडे दिला होता. परंतु, त्यांनी तपासी पोलिसांच्या अज्ञानाचा, तसेच त्यांच्यावर अवलंबून असल्याचा गैरफायदा घेतला. रविंद्र पाटील याने या डाटामधून आर्थिक फायद्यासाठी त्यातील वॉलेटमधून बिट कॉईन काढून स्वत:च्या तसेच इतर साथीदारांच्या वॉलेटवर घेतले. तर, पंकज घोडे याने अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी जप्ती पंचनामे करताना आरोपींच्या वॉलेटमधील ब्लॉकचेनचे स्क्रीनशॉट बनावटीकरण केले. या बनावट स्क्रीनशॉटला खरे असल्याचे भासवून तपासासाठी सादर केल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना पोलिसांची नोटीस.. शिवसेनेचे मंत्री म्हणाले, 'या नोटिसीबद्दल...'