पुणे - म्हाडाकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर येताच, या विभागाचे मंत्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री उशिरा परीक्षा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. तसेच, या प्रकरणी तीन आरोपींना पकडण्यात यश देखील सायबर पोलिसांना आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आघाडी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली. तर, या पार्श्वभूमीवर पुण्यातील शास्त्री रोडवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्याकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत राजीनामा द्यावा,अशी मागणी करण्यात आली.
आज होणाऱ्या परीक्षेला गावाकडून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे पुणे शहरात आले होते. एकीकडे सुरू असलेल एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि याच संपाचा विद्यार्थ्यांना बसलेला फटका याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होत असताना देखील विद्यार्थी हे परीक्षेसाठी पुण्यात आले. मात्र, अस असताना अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रासाला सामोरे जावं लागलं आहे. या सरकारला विद्याथ्यांशी काहीही घेणं देणं नसून फक्त या सरकारला आपलं सरकार कसं वाचवता येईल याकडे लक्ष आहे. अशी टीका देखील यावेळी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
सर्व विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे
आरोग्य विभागाचे पेपर फुटी प्रकरण ताजे असताना, आज म्हाडाकडून विविध पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, मध्यरात्री अचानक गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे ट्विट करून सांगतात. परीक्षा रद्द करण्यात येत आहे. एवढ्या उशिरा सांगून विद्यार्थी वर्गाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार महाविकास आघाडी सरकार आणि जितेंद्र आव्हाड जबाबदार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि अशा घटना भविष्यात घडू नये, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी केली आहे.
हेही वाचा - Sanjay Raut On Gopinath Munde : शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळलं होतं : संजय राऊत