पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या काराभाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने गुरुवारी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये आंदोलन केले. गेल्या काही काळात पुणे विद्यापीठाशी संबंधित समस्या, विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी, प्रशासनाचा अनागोंदी कारभार या सगळ्याबाबत पुणे विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करण्यासाठी अभाविपकडून हे आंदोलन करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबाबत समस्या -
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा यंत्रणेतून विधी शाखेचा अंतिम वर्षाचा पेपर गायब होणे. तसेच ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षा पार पडत असताना यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठ प्रशासनाकडे १४ हजार पेक्षा अधिक तक्रारी उपलब्ध झालेल्या असून, त्यावर काय उपाययोजना करणार याबाबत विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण दिले नाही. बीए, एलएलबी अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठ पूर्वी देण्यात येणारी बीएची पदवी मिळणार नाही, असे सांगत आहे. तसेच इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाचे गुण गृहीत धरून उत्तीर्ण केले जाईल, असे प्रशासन सांगत आहे. परंतु, अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊन देखील अशा पद्धतीचा निर्णय का घेत आहे, अशा अनेक समस्यांबाबत अभाविपने हे आंदोलन केले आहे.
अभाविपच्या विद्यार्थीं कार्यकर्त्यांचे आंदोलन
मुख्य इमारतीच्या पोर्चमध्ये अभाविपचे विद्यार्थीं कार्यकर्त्यांनी ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा धिक्कार केला. तसेच जोपर्यत मागण्या मान्य होत नाही तोपर्यत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा अभाविपने दिला आहे.
हेही वाचा - 'बिग बॉस' कोण? कलर्सचा मुख्यमंत्र्यांना इंग्रजीतून तर राज ठाकरेंना मराठीतून माफीनामा
हेही वाचा - आज मंत्रिमंडळ बैठक.. राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी कोणाच्या नावावर होणार शिक्का मोर्तब?