पुणे - 'पंतप्रधान मोदींना पवारांच्या घराचं एवढं काय पडलं आहे. पवारांच्या घराचं काय ते पवार बघतील. पवार एकत्र होते, एकत्र आहेत आणि उद्याही एकत्रच राहतील. शरद पवार आमचे दैवत असून, ते जे सांगतील ती आमच्यासाठी पूर्व दिशा आहे', अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींनी वर्धा येथे पवार घराण्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिले. ते पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित बैठकीत बोलत होते.
पंतप्रधान पदावर असलेली व्यक्ती ही सर्वांसाठीच आदरणीय असते. आम्हालाही ते आदरणीय आहेत. मात्र, देशाच्या पंतप्रधानांनी बेरोजगारी, महिला सुरक्षा, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, व्यापाऱ्यांचे प्रश्न यावर बोलायचे सोडून पवार घराण्यावर बोलतात, हे आश्चर्यकारक असल्याचे अजित पवार म्हणाले.
मंगळवारी पुण्यातल्या काँग्रेस भवन येथे पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचार नियोजनासंदर्भात आघाडीची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी मोदींच्या भाषणासंदर्भात प्रश्न उपस्थित केले. तसेच पवार यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. देशात आणि राज्यात आघाडीसाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे परस्परांतील मतभेद विसरून सर्वांना सन्मान देत निवडणूक जिंकायची, असा विश्वास पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. पाटील यांनीही परस्परातील मतभेद विसरून काम करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. निवडणुकीच्या काळात विरोधकांकडून अफवा पसरवल्या जातील, संभ्रम निर्माण केला जाईल, त्याला बळी पडू नका. ही लढाई उमेदवारापुरती मर्यादित नाही, तर ही लढाई आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, असे सांगत हर्षवर्धन पाटील यांनी एकजुटीने काम करण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.
पुणे लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाने मोहन जोशी यांना उमेदवारी दिल्यानंतर आता लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. बुधवारी काँग्रेस आघाडीचे पुणे आणि बारामती मतदारसंघाचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.