पुणे - पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या लसनिर्मिती संस्थेचे प्रमुख अदर पूनावाला यांचा समावेश वर्षातील सहा महत्त्वाच्या आशियाई व्यक्तींमध्ये झाला आहे. जगातील सर्वात मोठे लस उत्पादक म्हणून सिंगापूरच्या ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’ या वृत्तपत्राने अदर पूनावाला यांचा समावेश वर्षातील सहा महत्त्वाच्या आशियाई व्यक्तींमध्ये केला आहे. तसेच त्यांना ‘एशियन ऑफ दी इयर'ने देखील सन्मानीत करण्यात आले आहे.
कोरोनाच्या लसीचे संशोधन व उत्पादनासाठी एकूण सहा जणांची निवड या वृत्तपत्राने केली आहे. त्यामध्ये पूनावाला यांचा देखील समावेश करण्यात आला. अदर पूनावाला हे सीरम इन्स्टिटय़ूटचे प्रमुख असून, त्यांनी अॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केलेल्या कोविड लशीचे उत्पादन सुरू केले आहे. सन्मान यादीत चीनचे संशोधक झांग योंगझान, चीनचे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डॉ. रुइची मोरिशिटा सिंगापूरचे प्रा. ओई एंग एओंग आणि दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांचाही समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान सीरम इन्स्टिटय़ूटकडून सध्या कोरोनावरील लसीचे उत्पादन सुरू असून, लवकरच वितरणाला देखील सुरुवात होईल, कमीत कमी दरामध्ये देशातील प्रत्येक नागरिकाला ही लस मिळावी असे आमचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी पूनावाला यांनी म्हटले आहे. तसेच भविष्यात ही लस सर्व गरीब देशांनामध्ये देखील उपलब्ध करून देणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.