पुणे - काही कलाकारांच्या गटाने भाजप सरकारला तर काही कलाकारांच्या गटाने काँग्रेसला मतदान करा, असे जनतेला आवाहन केले आहे. यावरून मुळशी पॅटर्न सिनेमाफेम अभिनेता प्रवीण तरडेंनी कलाकारांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. कलाकारांच्या प्रसिद्धीचा वापर करून तुमच्यावर मत लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. कोणत्याही कलाकाराने आपले मत जनतेवर न लादता कलाकारच म्हणून राहावे, असे सडेतोड भूमिका त्यांनी मांडली.
कलाकार राजकीय भूमिका घेत आहेत. मात्र, कलाकार म्हणून ही चांगली गोष्ट नाही. या कलाकारांनी मोदींना मतदान करू नका,यापेक्षा काँग्रेसला मतदान करा, असे म्हणले असते तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते. मात्र, विरोध करण्याची एक नवीन पद्धत रुढ होत असल्याचे दिसत आहे. जर या कलाकारांमध्ये धमक असेलच तर त्यांनी त्यांचा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांना थेट आवाहन करावे,असा तरडेंनी सल्ला दिला. मोदी आम्हाला आवडत नाहीत. त्यामुळे मोदींचे समर्थन करणाऱ्या प्रेक्षकांनी आमचा सिनेमा बघू नये, असे कलाकारांनी जाहीर करावे, असे तरडेंनी म्हटले आहे.
लोकशाही धोक्यात आली नाही, असे वाटत नाही. अनेक कलाकारांनी कोट्यवधी रुपयांचे सिनेमे केले आहेत. तर अनेक कलाकार व्यसनी आहेत. त्यामुळे पवित्र मतदानाबाबत त्यांना सांगण्याचा अधिकार आहे का, असा त्यांनी सवाल केला. सिनेमावेळी धोरण वेगळे आणि मतदानावेळी धोरण वेगळे हा कलाकारांचा दुटप्पीपणा असल्याची टीका तरडेंनी केली. कोणालाही मतदान करा, पण मतदान करा असे त्यांनी आवाहन केले.