पुणे - दररोजच्या वापरात माणूस प्रत्येकाशी काहींना काही बोलत असतो. वाक्य उच्चारत असतो. मात्र गुन्हेगारी जगात हेच वाक्य कोडवर्ड ( Criminal Codewords ) म्हणून वापरले जातात. जेणे करून आजूबाजूला असलेल्या आणि संभाषण करत असताना कोणीही फसू नये, अशाच कोडवर्डचा वापर म्हाडा पेपर फुटी ( Mhada Paper Leak Case ) प्रकरणात आरोपींकडून वापरण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी ( Pune Police ) देखील याला दुजोरा देत प्राथमिक माहितीत आरोपी हे कोडवर्डमध्ये बोलत असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ( Pune Police Commissioner Amitabh Gupta ) यांनी दिली आहे.
- आरोपींकडून कोडवर्डचा वापर
म्हाडा पेपर फुटी प्रकरणात पुण्याचे सायबर सेलकडून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या प्राथमिक तपासणीत हे लक्षात आले आहे, की आरोपी हे या प्रकरणात कोडवर्डचा वापर करत होते. घरातील वस्तू कधी मिळणार? हे वाक्य या आरोपींकडून कोडवर्ड म्हणून वापरण्यात आले आहे. घर म्हणजे म्हाडा आणि वस्तू म्हणजे पेपर अशा प्रकारचे कोडवर्डचा वापर या आरोपींकडून वापरण्यात आले आहे.
- अनेक उमेदवार होते आरोपींच्या संपर्कात
म्हाडाच्या रविवारी होणाऱ्या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांकडून जी.ए.सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा संचालक डॉ. रितेश देशमुख, अंकुश रामभाऊ हरकळ, संतोष हरकळ यांना अटक करण्यात आलेली आहे. याचा तपास देखील पुणे सायबर पोलिसांकडून सुरू आहे. या तपासात अनेक महत्त्वाची माहिती पुढे येऊ लागली आहे. अंकुश आणि संतोष हरकळ यांच्या संपर्कात अनेक विद्यार्थी होते. विशेषता शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांना अनेक उमेदवारांचे फोनही येऊ लागले होते. पोलिसांनी त्यांना उमेदवारांशी बोलण्यास सांगितले. तेव्हा अनेक उमेदवार हे घरातील वस्तूचे काय? असा प्रश्न त्यांना विचारीत होते. उमेदवार नेमका काय विचारतात असा प्रश्न पोलिसांनाही पडला. याबाबत त्यांनी आरोपींकडे विचारणा केली असता, तेव्हा ते वाक्य कोडवर्ड असल्याची माहिती पुढे आली आहे. प्रश्नपत्रिका मिळण्यासाठी अनेक उमेदवार आरोपीही सातत्याने फोनवर संपर्कात होते. आरोपींना पकडल्यानंतर आता त्यांना फोन करणाऱ्या विद्यार्थ्यांचीही पोलिसांकडून चौकशी होणार आहे, असे यावेळी अमिताभ गुप्ता म्हणाले. सायबर पोलिसांची अनेक पथके राज्यातील विविध जिल्ह्यात शहरात पाठवण्यात आली आहे. तसेच त्यांचा तपास देखील सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे म्हाडाच्या पेपरसाठी 30 ते 35 लाख रुपये घेतले जाण्याची शक्यता देखील होती. त्या दृष्टीने पोलीस तपास देखील करत आहे.
- आरोपींकडून अशी करण्यात आली होती तयारी
आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गाच्या पदाच्या परीक्षांच्या पेपर फुटीच्या तपासासाठी सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये असताना आज होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेचे पेपर फोडण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यामध्ये गुंतलेल्या संशयीतांबाबत पुणे शहर पोलीसांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे सायबर क्राइम विभागाकडील पथके तयार करून त्यांना औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे परिसरामध्ये संशयिताना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. त्यांनतर औरंगाबाद परिसरातील संपर्क साधून त्यांच्याकडून आर्थिक फायदा मिळवून त्यांना परीक्षेच्या पूर्वी पेपर फोडून त्यांना देण्याची योजना टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडेमीचे संचालक कृष्णा जाधव आणि इतर यांनी आखल्याची माहिती प्राप्त झाली होती. तसेच सध्या पुण्यामध्ये राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांनी म्हाडाच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या परीक्षार्थीना पेपर देण्याची तयारी दर्शवली होती.
- जी ए सॉफ्टवेअरचे प्रितेश देशमुख यांना अटक
पोलीस पथकाने टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडेमीचे संचालक कृष्णा जाधव आणि त्यांचे सहकारी अंकित चनखोरे यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे म्हाडाच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या ३ परीक्षार्थी यांची प्रवेशपत्रे त्यांची मूळ शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे कोरे धनादेश आरोग्य विभागाच्या क वर्गासाठी बसलेल्या १६ आणि ड वर्गासाठी बसलेल्या ३५ परीक्षार्थी यांच्या नावाच्या याद्या प्रवेश पत्रांच्या प्रती मिळून आले. आरोपी हे आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपर फुटी प्रकरणी संबंधित असल्यामुळे त्यांना सायबर पोलीस स्टेशन विविध कलमा अतंर्गत अटक करण्यात आली आहे. तसेच पुणे व ठाणे परिसरामध्ये नेमलेल्या पथकांनी संशयित संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्या हालचालीचा मागोवा घेऊन त्यांना त्यांची क्रेटा गाडी क्रमांक MH20 / EL ७१११ मधून ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत गाडीमध्ये प्रितीश देशमुख मिळून आले आहेत. प्रितीश देशमुख हे जी ए सॉफ्टवेअर या कंपनीचे संचालक असून त्यांच्या संस्थेतर्फे म्हाडाच्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. प्रितीश देशमुख यांच्या झडतीमध्ये त्यांच्या सोबत असलेल्या लॅपटॉपमध्ये म्हाडाच्या लेखी परीक्षेचे पेपर मिळून आले. तसेच त्यांच्यासोबत लिफाफ्यामध्ये पेन ड्राईव्ह मिळून आले असून त्यामध्येही म्हाडाच्या लेखी परीक्षेचे पेपरसेट आढळून आले आहे.
हेही वाचा - MHADA Exam : आरोग्य विभागानंतर आता म्हाडा; परीक्षा... पेपरफुटी... पाहा विशेष रिपोर्ट