पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून ईडी विरुद्ध संजय राऊत (ED Action on Sanjay Raut) असा सामना रंगताना पाहायला मिळत होता. आता थेट संजय राऊत यांच्यावरच ईडीने कारवाई केली आहे. राऊत यांचे अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एक फ्लॅट ईडीने जप्त केले आहेत. यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सर्व राजकीय हेतूने होत आहे. देशात सध्या लोकशाही नसून, केंद्राकडून दबावतंत्राचा वापर सुरू आहे. यावर विचार करायला हवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
लोकं जाहीर सभेत जनतेला धमकी द्यायला लागले - भाजपबरोबर गेले नाहीत म्हणून परिणाम भोगावे लागतात असे राज ठाकरे म्हणाले होते. यावर आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, असे जर दबाव आणत असेल तर आपल्या देशात लोकशाही आहे का यावर विचार करण्याची गरज आहे. लोकं जाहीर सभेत जनतेला धमकी द्यायला लागले आहेत. मग देशात लोकशाही आहे का? हा प्रश्न आहे. शिवसैनिक हे एकजूट येत आहेत. जो समोरून येत आहे त्याला ताकद दिसेल, असे देखील यावेळी ठाकरे म्हणाले.
लोकशाही या देशात आहे की नाही? - राजकीय विधानांवरून, कोणाला कधी अटक होणार? कोणाला काय होणार? त्यानुसार न्याय प्रक्रिया आणि लोकशाही या देशात आहे की नाही? असा प्रश्न देखील पडतो. देशात खरंच लोकशाही राहिली आहे का यावर खूप विचार करण्याची गरज आहे. देश कुठल्या दिशेला चालला आहे याचा विचार व्हायला हवा, असे देखील यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.