पुणे - दोन दिवसा आधी पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या धनकवडी शाखेतील लॉकरमधून 16 तोळ्यांचे दागिने चोरी गेल्याचा प्रकार घडला होता. बँकेत लॉकर दुरुस्तीसाठी आलेल्या व्यक्तीनेच लॉकर तोडून त्यामधील १६ तोळ्यांचे दागिने चोरून नेल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सोमनाथ जयचंद मुळीक (२१, रा. हडपसर, मूळ. रा. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका ६६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादी महिलेने आपल्याकडील १६ तोळ्यांचे दागिने धनकवडीतील कॉसमॉस बँकेच्या शाखेत ठेवले होते. मात्र, लॉकर दुरुस्तीसाठी बँकेने त्यांना साहित्य घेऊन जाण्यास सांगितले. महिला साहित्य नेण्यासाठी बँकेत आल्यानंतर दागिने चोरी गेल्याचे तिच्या लक्षात आले. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी बँकेतील कर्मचाऱ्याकडे तपास केला असता १० मे रोजी बँकेतील लॉकर दुरुस्तीसाठी आदित्य एंटरप्रायजेस या कंपनीचा एक कर्मचारी येऊन गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लॉकर दुरुस्तीसाठी आलेल्या मुळीक याचा शोध घेऊन त्याला नवले पूल परिसरातून ताब्यात घेतले.
बँकेत लॉकर दुरुस्ती करीत असताना तेथील कर्मचाऱ्याची नजर चुकवून शेजारील लॉकर उघडून त्यातील दागिने चोरल्याचे मुळीकने कबूल केले आहे. चोरलेले दागिने मुळीक याने त्याचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील मुळीकवाडी येथील रानामध्ये ठेवले होते. पोलिसांनी त्याच्याकडून ४ लाख ८० हजार रुपये किमतीचे सर्व १६ तोळे दागिने जप्त केले आहेत.
हेही वाचा - मला नौटंकी करायला अजिबात आवडत नाही - अजित पवार