पुणे - एका 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला 'डेटिंग' साठी मुलगी पुरवण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी त्यांच्याजवळील पावणेचार लाख रुपये लुटले. या ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून पुण्यातील कॉर्टर गेट परिसरात वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी ते घरी असताना त्यांच्या मोबाईल फोनवर एका तरूणीचा फोन आला. समोरील तरुणीने त्यांच्याशी गोड बोलत आयुष्यातील एकटेपणा घालवण्यासाठी मुली पुरवत असल्याचे सांगितले. या ज्येष्ठ नागरिकाने समोरील तरुणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ती म्हणेल त्याप्रमाणे केले. या तरुणीने त्यांना एका बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. तरुण मुलीसोबत 'डेटिंग'ला जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकानेही ती म्हणेल त्याप्रमाणे वेळोवेळी बँक खात्यावर पैसे भरले. 3 लाख 74 हजार रुपये भरल्यानंतर आणखी पैशाची मागणी होऊ लागल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास समर्थ पोलिस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.