पुणे - महापौर मुरलीधर मोहोळ यांना शनिवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर झाले होते. त्यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी केली असता आठ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
महापौरांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील 17 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यातील आठ जणांचे अहवाल काही वेळापूर्वीच आले असून ते सर्व पॉझिटिव्ह आहेत. इतरांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. ज्या आठ जणांना कोरोनाची लागण झाली त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे समोर आले आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी ट्विटकरून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. यातून आपण लवकरच बरे होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत येऊ, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, पुणे शहराला सध्या कोरोनाचा विळखा बसला आहे. शहराला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा झटून काम करत आहे. महापौर मुरलीधर मोहोळ हे स्वतः आघाडीवर राहुन काम करत होते. त्यांच्या कामाचे कौतुक पालकमंत्री अजित पवार यांनी देखील केले होते. मात्र, मोहोळ यांनाच कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनाला थोडा अधिक ताण सहन करावा लागणार आहे.