पुणे - पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकरनगरमध्ये दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने बुधवारी मध्यरात्री धुडगूस घालत तब्बल 40 ते 50 वाहनांची तोडफोड केली. या टोळक्याने रिक्षा, टेम्पो, बाईक यासह रस्त्यात दिसेल त्या वाहनांची तोडफोड केली आहे. या सर्व प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
![50 vehicles vandalized in Pune market yard](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-vehical-todfod_28012021124603_2801f_00986_554.jpg)
मार्केट यार्ड परिसरातील आंबेडकर नगर भागात कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. कष्टकऱ्यांची प्रवासी रिक्षा, टेम्पो रिक्षा, दुचाकी, हातगाडी यासारखी अनेक वाहने रस्त्यावर पार्क केलेली असतात. बुधवारी मध्यरात्री दहा वाजण्याच्या सुमारास दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने हातांमध्ये तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन या परिसरात धुमाकूळ घातला. समोर दिसेल त्या वाहनांची तोडफोड केली. वाहनांच्या सीट फाडल्या. तब्बल तासभर या टोळक्याचा धुडगूस सुरू होता.
आरोपींचा शोध सुरू -
दरम्यान पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोडफोड झालेल्या वाहनांची पाहणी केली. त्यानंतर दहा ते पंधरा जणांच्या टोलच्या विरोधात मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यातील चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
नागरिक संतप्त -
या सर्व प्रकारानंतर स्थानिक नागरिक मात्र चांगलेच संतप्त झाले. पोलिसांचा वचक राहिला नसल्यामुळे गुन्हेगार अशा प्रकारचे कृत्य करण्यास धजावत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त घालावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी यावेळी केली.