पुणे : राज्यासह देशात दिवसागणिक वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे चिंता वाढत असतानाच पुण्यातून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील तब्बल 444 गावं कोरोनामुक्त झाली आहेत. कोरोना संसर्ग वाढल्यानंतर या गावातील ग्रामस्थांनी नियमांचे काटेकोर पालन करत गावातून कोरोनाला हद्दपार केले आहे.
31 टक्के गावे कोरोनामुक्त
पुणे जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाने कहर केला. एकीकडे जिल्हाभरात रुग्ण वाढत असताना जिल्ह्यातील 444 गावांमधून मात्र कोरोना हद्दपार झाला आहे. ही बाब प्रशासनाला दिलासा देणारी आहे. या गावांत सक्रिय रुग्णांचे प्रमाण शून्य झाले आहे. जिल्ह्यात 1 हजार 404 ग्रामपंचायती आहेत. त्यातली 444 गावे सध्या कोरोनामुक्त झाल्याने 31.62 टक्के गावं कोरोनामुक्त झाली आहेत.
भोर तालुक्यातील 101 गावे कोरोनामुक्त
जिल्ह्याचा विचार केला तर भोर तालुक्यातील सर्वाधिक 101 गावे सध्या कोरोना मुक्त आहेत. तर सर्वाधिक कमी गावे शिरूर तालुक्यात आहेत इथल्या 10 गावांमधील कोरोना रुग्णांची संख्या शून्य झाली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय आंबेगाव तालुक्यात 19, बारामतीमध्ये 16, भोर येथे 101, दौंड तालुक्यात 12, हवेलीतील 22, इंदापूरमधील 27, जुन्नर येथील 11, खेडमधील 62, मावळ येथील 62, मुळशीमधील 24, पुरंदरयेथील 22, शिरूर येथील 10 तर वेल्हा येथील 56 गावेही कोरोनामुक्त झाली आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना
दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यात झपाट्याने रुग्ण वाढ होत असताना 444 गावांमध्ये सध्यातरी एकही सक्रीय रुग्ण नाही. त्यामुळे कोरोनाला रोखण्यात प्रशासनाला या भागात यश येत आहे. पुढील काही दिवसांमध्ये आणखी गावे कोरोनामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना राबवून त्याची गावांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे.