पुणे - गेल्या काही महिन्यानंतर पुन्हा एकदा राज्यासह पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. त्याच पद्धतीने कोरोनाचा नवीन व्हायरस ओमायक्रॉनचे देखील रुग्ण राज्यात वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून खबरदारीचे पाऊस देखील उचलले जात आहे. वाढती रुग्णसंख्या तसेच नवीन व्हायरसची खबरदारी म्हणून शाळा सुरू झालेली असताना देखील पालक मुलांना शाळेत पाठवत नसल्याचे चित्र दिसत आहे. पुणे शहरात शाळा सुरू होऊनही शहरात 40 टक्केच विद्यार्थी हे ऑफलाइनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहे. तर 60 टक्के विद्यार्थी हे ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
60 टक्के विद्यार्थी हे ऑनलाईन -
पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा 16 डिसेंबर पासून सुरू करण्यात आले आहे. राज्यातील शाळा 1 डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र पुणे शहरातील स्थानिक प्रशासनाने याला विरोध दर्शवला होता आणि पुणे शहरातील शाळा 15 डिसेंबरपर्यंत सुरू न करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला होता. त्यांनतर महापालिकेने महापालिका हद्दीतील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण शाळा सुरू झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून नवीन व्हायरस ओमायक्रॉनच्या रुग्णांत दिवसंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे कोरोना रुग्णांमध्ये देखील वाढ होत असल्याने पालकांनी मुलांना शाळेत न पाठवलाच चित्र पुणे शहरात दिसत आहे. शहरात शाळा सुरू होऊन ही 40 टक्केच विद्यार्थी हे शाळेत येत असून 60 टक्के विद्यार्थी हे ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहे.
पालकांच्या संमतीनेच मुलांना शाळेत प्रवेश -
पुण्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शाळेच्या माध्यमातून शासनाने दिलेल्या नियमावलीच पालन करून शाळा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थ्यांची थर्मामीटरने तपासणी तसेच मास्क आणि सॅनिटायझेशनचा वापर करूनच शाळेत प्रवेश देण्यात येतो. वर्गात देखील एकाच बेंचवर एक विद्यार्थी बसविण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या पालकांनी शाळेला हमीपत्र दिले आहे, अशाच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हमीपत्र दिलेलं नाही अश्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत आहे.ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही माध्यमातून शाळा सुरू आहे. शहरात कोरोना नियंत्रणात असून यावर प्रशासन म्हणून आमची बारकाईने नजर आहे. तसेच शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या नियमावलीचे पालन करायला सर्व शाळांना सांगत आहोत, असे देखील यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.