राजगुरुनगर (पुणे) - समुद्रसपाटीपासून २१ हजार फुट उंचीवर, ५५ ते ६० अंश सेल्सिअस तापमानात ४० फुट बर्फात खड्डा करून स्वत:ला गाडून घ्यायचे, ऑक्सिजन कमी असल्याने हालचाल गरजे इतकीच करायची, तसेच एकमेकांशी बोलायचे ते सुध्दा मर्यादित, जेवण मिळो ना मिळो अंगावर ३५ किलोचा सुरक्षा पोशाख घालून अवजारे सांभाळत २४ तास जवळ असलेला दारू गोळा शत्रूच्या नजरेतून राखायचा. प्रसंगी त्याचाच वापर करून प्रतिहल्ला करायचा. हो आणि हे काम हाती घेतले तर किमान सहा महिने मागे फिरता येत नाही. मातीशी असलेली नाळ व नात्यातील बंधने झुगारून देऊन देशाच्या संरक्षणासाठी स्वत:ला मरणाच्या सीमेवर झोकून देणे म्हणजे भारत भूमीचा सुपुत्र असल्याचे सिध्द करण्याचा महायज्ञ पार पाडल्या सारखे असल्याचे मत भारतीय सैन्यदलाच्या ‘१९ मराठा रेजिमेंट इंफट्री’ पथकाचे नेतृत्व करणाऱ्या आनंद बाळासाहेब खंडागळे यांनी मांडले.
खेड तालुक्यातील गाडकवाडी गावच्या सैन्यदलातील जवानाने आपले सैन्यातील अनुभव मांडत, भारत-चीन सीमेवर गेली काही महिने युद्धजन्य स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सियाचीन भागात ७८ किलोमीटर बर्फाच्छादित डोंगर व पर्वत रांगांत भारत, पाकिस्तान आणि चीनचे सैनिक आपापल्या देशाच्या सीमा रक्षणाचे काम अहोरात्र करतात. एका वेळी भारताचे १ हजार ५०० सैनिक येथे बर्फाच्या कृत्रिम गुहा रुपी घरात तैनात असतात. दोन देशांच्या चिघळलेल्या स्थितीत चीनी सैन्या बरोबर सौहार्दतेने आणि तेवढ्याच तडपेने सामना करण्यासाठी देशाचे संरक्षण खाते नेहमी मराठा सैनिकांना प्राधान्य देते.
‘सियाचीन मेडेल’ पुरस्कार जाहीर...
संघर्षात्मक स्थितीत शत्रूला नामोहरम करण्याचे धैर्य आणि तसा कावा आखणाऱ्या पथकांच्या नेतृत्वांमध्ये खेड तालुक्यातील आनंद खंडागळे यांची निवड करण्यात आली होती. जाहीर वाच्यता न करता येणाऱ्या अनेक युद्धजन्य घटना त्यांनी घडवून आणल्या. मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात खंडागळे यांना पाकिस्तान सीमेवर पाठवण्यात आले होते. तेथूनच सियाचीनच्या सीमेवरील स्थिती हाताळण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. नुकतेच म्हणजे १८ सप्टेंबरला ते गावी आले आहेत. सियाचीन बॉर्डरवर केलेल्या पराक्रमांची दाखल घेऊन त्यांच्या व त्यांचे दुसऱ्या पथकाचे सहकारी असलेले राहुल गाजरे (लातूर) याना मानाचा ‘सियाचीन मेडेल’ पुरस्कार जाहीर झाला आहे.येत्या २६ जानेवारीला दिल्ली येथे सैन्याचे वरिष्ठ अधिकारी ननावरे यांच्या हस्ते हा पुरस्कार दोघाना प्रदान करण्यात येणार आहे. गेल्या दहा वर्षांत हा पुरस्कार सैन्यदलात कोणालाही देण्यात आलेला नाही, असे खंडागळे यांनी सांगितले.