पुणे - महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे काही नगरसेवक नाराज असून विकास आघाडी प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेनंर पुणे मनपाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीकडून सत्ता खेचून आणली होती. त्यावेळी भाजपाने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर पक्षातील नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली होती. आता मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. तसेच अजित पवार यांनीही पुणे महानगर पालिका पुन्हा खेचून आणण्यासाठी जोर लावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपाचे काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
बापटांनी फेटाळली शक्यता-
भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी मात्र नगरसेवक फुटण्याच्या या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. भाजपचे नगरसेवक कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विकास कामासाठी निधी मिळत नसल्यामुळे काही नगरसेवक नाराज जरूर आहेत. परंतु ते पक्ष सोडून जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महापालिकेकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे नगरसेवकांना निधी देण्यासाठी सध्या अडचण निर्माण होत आहे. परंतु कुठल्याही नगरसेवकाच्या वार्डातील विकास कामे थांबणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ आणि नगरसेवकांना पुरेसा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. परंतु नगरसेवक पक्ष सोडून जाणार आहेत, अशी जी काही चर्चा होत आहे. त्यामध्ये काही तथ्य नाही, असे खासदार बापट यांनी स्पष्ट केले.
विरोधकांनी आपले पक्ष सांभाळावेत-
भाजपचे १९ नगरसेवक नाराज असून बंडाच्या भूमिकेत असल्याची अफवा असून लोकांमध्ये संशय निर्माण करणे आणि काहीतरी राजकीय अस्थिरता दाखवण्यासाठी चर्चा करायच्या हे सध्या सुरू आहे. मात्र, यात कोणतेही तथ्य नाही. भाजपचा एकही नगरसेवक पक्ष सोडून जाणार नाही, उलट मी विरोधकांना आवाहन करेल की आपापले पक्ष संभाळा. येणारी महापालिका निश्चितच आम्ही जिंकू असा मला विश्वास आहे असे देखील बापट म्हणाले.
राज्यात सध्या केंद्राला दोष देण्याची एक प्रवृत्ती निर्माण झाली आहे. अन्न धान्य वाटपापासून ते औषधांपर्यंत अनेक राज्यांना केंद्राने मदत केली आहे. मात्र वाद निर्माण करून लोकांना वेगळ्या दिशेने नेण्याचे प्रकार महाराष्ट्र राज्यातील काही मंत्री महोदय करत आहे अशी टीका देखील बापट यांनी केली.