पुणे - ऊसतोड कामगारांना 14 टक्के वाढ देण्यात आली आहे. यानुसार 35 ते 45 रुपये ऊसतोड कामगारांना जास्त मिळतील, असे साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी जाहीर केले. यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना 300 ते 350 कोटी रुपये त्यासाठी द्यावे लागतील, असे त्यांनी जाहीर केले आहे.
हेही वाचा - 'मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची बेपर्वाई'
पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे ऊसतोड कामगाराच्या प्रश्नावर बैठक आयोजित करण्यात आली होती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ऊसतोड कामगारांना 14 टक्के वाढ देण्याचा निर्णय झाला. या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस यांच्यासह कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.
प्रामाणिकपणाची भूमिका असेल तर आम्ही सोबत; पंकजा मुंडेंवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
ऊसतोड कामगारांच्या संपावर निघालेल्या तोडग्यावर आम्ही समाधानी आहोत, असे सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. तर या बैठकीला उपस्थित असलेल्या पंकजा मुंडे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, भले ही आमचे राजकीय मतभेद असतील आम्ही स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधात असू, परंतु एखाद्याची भूमिका प्रामाणिकपणाची असेल तर आम्ही अशा विषयावर सोबत असू असे ते म्हणाले. मी कुठलाच आकडा जाहीर केला नव्हता, जी काही वाढ मिळाली त्यावर आम्ही समाधानी आहोत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ लवकरच कार्यान्वित होणार
गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ लवकरच कार्यान्वित होणार आहे. नोव्हेंबरमध्ये नोंदणी सुरू होईल. त्यातून त्यांचे अनेक प्रश्न मिटतील, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. तर पक्षाबाबत बोलताना, सगळे म्हणतात मी नाराज आहे, मी नारज असण्याचा काही विषयच नाही. सुरेश धस यांना बाहेर का थांबायला सांगितले याविषयी मला माहिती नाही. मला निमंत्रण होते, मी बैठकीला आले. माझा दबाव असण्याचे कारण नाही, असेही त्या म्हणाल्या. तर, धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलताना, जनतेच्या प्रश्नावर एकत्र असण्यात काही वावगे नाही याचा अर्थ मागचे सगळे मिटले असेही नाही, असे देखील त्या म्हणाल्या.
ऊसतोड कामगारांचे मी पालकत्व घेतले - पंकजा मुंडे
पराभव साजरा करण्यात गैर काय, मी खिलाडी वृत्तीने पराभव स्विकारला आहे. इतके दिवस मी घरात राहिले तर का घरात आहे असे बोलतात. आता बाहेर पडले तर पराभव साजरा करत आहेत म्हणतात. पराभव साजरं करायचे नशीब कुणाला मिळते, एखादी पराभूत व्यक्ती नांदेडपासून 8 जिल्ह्यांमध्ये स्वागत सत्कार घेतल्यांनंतर मोठा मेळावा होत असेल तर ही पुण्याईच म्हणावी लागेल. ऊसतोड कामगारांचे नेतृत्व हा माझ्यासाठी महत्वाचा विषय नाही, त्यांचे पालकत्व माझ्यासाठी महत्वाचे असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. खडसेंच्या प्रवेशाविषयी मी भावना व्यक्त केलेल्या आहे. अशा कोणत्याही घटना महाराष्ट्रात झाल्या की माझ्या नावाची चर्चा होते, असे पंकजा म्हणाल्या.
सुरेश धस यांना कोणीही अडवले नाही - शरद पवार
दुसरीकडे शरद पवार यांना यावेळी मराठा आरक्षणाबाबत विचारले असता त्यांनी त्यावर बोलणे टाळले, तर भाजप आमदार सुरेश धस यांना सुरुवातीला बैठकीला न घेण्याबाबत विचारले असता, सुरेश धस यांना कोणीही अडवले नाही. ते आल्याचे समजल्यावर त्यांना बोलावले होते, असे शरद पवार म्हणाले. तसेच कांदा प्रश्नाबाबत मी उद्या नाशिकला जाणार आणि कांदा उत्पादकांना भेटून त्यांची भुमिका जाणून घेणार आहे. केंद्र सरकारची भुमिका ही शेतकऱयांच्या हिताची आहे असे वाटत नाही, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.