पुणे - महाराष्ट्रातील विविध भागात महापुराने प्रचंड नुकसान झाले आहे. या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आता पुण्याचे भाजप नगरसेवक पुढे आले आहेत. पुरग्रस्त भागासाठी आर्थिक मदत म्हणून पुणे महापालिकेचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक एक महिन्याचे मानधन पूरग्रस्त भागास देणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे काही जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सांगली, पुणे या जिल्ह्यातील परिस्थिती अधिक गंभीर आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे जीवितहानी बरोबरच शेतीचे, उद्योगधंद्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असंख्य लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. कोरोनासारख्या संकटाला तोंड देत असताना आलेली ही आपत्ती वेदनादायी आहे. कोकणातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचा जगण्यासाठी चाललेला संघर्ष हा मन पिळवटून टाकणारा आहे. त्यांच्या या जगण्यासाठीच्या संघर्षात खारीचा वाटा म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार सर्व सभासदांनी आपले एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र कोरोना अपडेट - रुग्णसंख्या घटली, ४,८७७ नवीन रुग्ण, ५३ रुग्णांचा मृत्यू