पणजी - गोव्याने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यात 3 एप्रिलनंतर एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. मागील काही दिवसांपासून होमक्वांरनटाईनची संख्याही स्थिर आहे. आज प्राप्त झालेले 99 अहवालही निगेटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्य स्थितीत कोरोना संशयित रुग्णांचे नमुने जरी निगेटिव्ह येत असले तरीही सरकारकडून दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे गोव्यात आज 11 जणांना फॅसिलिटी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आल्याने अशा संभाव्य रुग्णांची संख्या 16 आहे. तर गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या विलगीकरण कक्षात तिघांना दाखल केल्याने तेथील संख्या 4 झाली आहे.
दिवसभरात 52 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तर रुग्णालायातून यापूर्वीच डिस्चार्ज देण्यात आलेल्या तीन रुग्णांना खबरदारी म्हणून सरकारी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्या तिघांनी सात दिवस क्वारंटाईन पूर्ण केल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. परंतु, तेथेही ते सात दिवस होमक्वारंनटाईन राहतील, अशी माहिती आरोग्य विभागाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच ४ जणांना यापूर्वीच सोडून देण्यात आले आहे.
गोवा सरकारने 29 जानेवारीपासून आतापर्यंत 1541 जणांची कोरोना चाचणी केली. त्यापैकी 1540 अहवाल प्राप्त झालेत. ज्यातील केवळ 7 अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर आतापर्यंत 1794 जणांना होमक्वारंनटाईन करण्यात आले आहे. सरकारने लॉकडाऊन काळात नागरिकांना जीवनावश्यक सामानाची खरेदी करता यावी याकरिता काही अटी आणि शर्तीवर नागरिकांना लॉकडाऊनमधून सवलती दिल्या आहेत.