पणजी - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगित असलेले मोपा विमानतळाचे काम सुरू होताच तेथे कॅसिनोंसाठी 'गेमिंग झोन' तयार करण्यात येईल. ज्यामुळे येथील कॅसिनो जहाजे हालविणे सोपे होईल, अशी माहिती गोव्याचे बंदर आणि कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी दिली.
बंदर आणि कप्तान खात्याच्या पणजीतील कार्यक्रमास आले असता लोबो यांनी मांडवी कॅसिनो हळूहळू स्थलांतरित केले जातील, असे म्हटले होते. यावर विचारले असता, मोपा विमानतळ सुरु झाल्यानंतर तेथे मोपा नियोजन आणि विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विमानतळासमोर 'गेमिंग झोन' तयार करण्यात येणार असल्याचे लोबो म्हणाले. ज्यामुळे मांडवीतील कॅसिनो तेथे स्थलांतरित करण्यात येतील. यासाठी सरकारचे कॅसिनो धोरण निश्चिती व्हायची आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी याची कल्पना भाजप आमदार आणि संबंधितांना दिली होती.
पर्यटनाचा विचार करता मांडवीतील कॅसिनो पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे, असे सांगून लोबो म्हणाले, यामुळे हंगामा व्यतिरिक्त पर्यटक येतात. येणारे सर्वजण जुगार खेळत नाहीत. काही कुटुंबासह याचा अनुभव घेण्यासाठीही येत असतात. ते संध्याकाळचा वेळ यामध्ये घालवतात. मात्र, ही करत असताना कॅसिनो धोरण ठरणे आवश्यक आहे. जे अजून झालेले नाही. मुख्यमंत्री अर्थव्यवस्था, रोजगार सुरळीत करण्यात व्यक्त आहेत. त्यानंतर याकडे लक्ष देतील.
हेही वाचा - कॅसिनोंना मुदतवाढ देण्याऐवजी योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचा सरकारचा विचार - मायकल लोबो
सरकार जरी कॅसिनो काही कालावधीनंतर मांडवीतून स्थलांतरीत करणार असे म्हणत असले तरीही पणजी महापालिकेने कॅसिनो कार्यालयांचे परवाने नूतनीकरण न करण्याचा ठराव संमत केला आहे. याकडे कसे पाहता असे विचारले असता लोबो म्हणाले, या संदर्भात महापालिकेने आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी विनंती करणार आहोत. कारण कॅसिनो जहाज हे व्यवसायाचा एक भाग आहे. त्यामुळे अचानक हालविणे शक्य नाही. त्यांनाही काही वेळ दिला पाहिजे. सध्या एक कॅसिनो मालक मांडवीतून आग्वाद परिसरात कॅसिनो स्थलांतरीत करण्यास तयार आहे. त्यासाठी बंदर कप्तान कडून जागेची पाहणी सुरू आहे. त्याचा अहवाल प्राप्त होतच स्थलांतर प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
दरम्यान, यावेळी उपस्थित असलेले पणजी महापौर उदय मडकईकर यांना पालिका आपला ठराव मागे घेणार का ? असे विचारले असता ते म्हणाले, ठराव मागे घेण्याचा प्रश्न नाही. कारण सरकारने कॅसिनो स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापलिकेने कॅसिनोंना विरोध दर्शवला नाही. तर कॅसिनो येथून स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक अवधी मिळून सोपे व्हावे यासाठी ५ महिने अगोदर कार्यालय परवाना नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - गोव्यासाठी स्वतंत्र टपाल विभाग निर्माण होणार, मुख्यमंत्री सावंत यांची माहिती