पणजी - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गोव्यातील रिक्षा, टॅक्सी आणि मोटरसायकल पायलट व्यावसायिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊ सुरू झाल्यापासून हा व्यवसाय बंदच आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना मदत मिळणे आवश्यक आहे. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी जुने गोवे, करमळी, खोर्ली आदी भागातील व्यावसायिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.
मंत्री नाईक यांनी गुरूवारी करमळी रेल्वे स्थानकावरील व्यावसायिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. याबद्दल टॅक्सी मालक संघटनेचे अध्यक्ष सुनील नाईक यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. कोकण रेल्वे महामंडळाने टॅक्सी चालकांना प्रीपेड काऊंटरची जागा देण्यासाठी संघटनेकडे 1 लाख 5 हजार 9 रुपयांची मागणी केली आहे. महामंडळाने ही रक्कम माफ करावी यासाठी केंद्रीय मंत्री नाईक यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती सुनील नाईक यांनी केली आहे. याबाबत कोकण रेल्वेसोबत चर्चा करणार असल्याचे आश्वासनही मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले.