पणजी- उत्तर गोव्यातील शिवोली-चोपडे पुलावार एका गाडीने चुकीच्या बाजूने येत समोरून येणाऱ्या वाहनाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मोरजी (ता. पेडणे) येथील पिता-पूत्र जागीच ठार झाले आहेत. तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर संतप्त जमावाने अपघातास कारणीभूत वाहन पेटवून दिले.
उत्तर गोव्यातील सर्वाधिक रहदारी असलेल्या शिवोली-चोपडे या पुलावर आज सकाळी पावणे सातच्या सुमारास हा आपघात घडला. मोरजीच्या दिशेने जाणाऱ्या आणि महाराष्ट्रात नोंदणी असलेला गाडी चालक समोरील वाहनाला मागे टाकण्याचा प्रयत्न करत होता. याचवेळी चालकाने मोरजी-विठ्ठलदासवाडा येथून शिवोलीच्या दिशेने येणाऱ्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की, आवाजाने परिसरातील लोक धावून घटनास्थळी दाखल झाले. अपघात घडल्यानंतर वाहनातील सर्व प्रवाशांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
या अपघातात मोरजीहून शिवोलीकडे येणाऱ्या वाहनातील जुआंव फर्नाडिस (वय ६२) आणि जुडास फर्नांडिस (वय २५) यांचा जागीच मृत्यु झाला. तर याच कुटुंबातील चार सदस्य आणि त्यांचे दोन मित्र (सर्व रा. मोरजी) हे जखमी झाले आहेत. जखमींना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर स्थानिकांनी सर्व संशयितांना ताब्यात घेण्याची मागणी करत मार्ग रोखून धरला. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक चंदन चौधरी, म्हापसा पोलीस निरीक्षक कपिल नायक, हणजूण पोलीस निरीक्षक नवलेश देसाई आणि अन्य पोलीस अधिकारी जमावाची समजूत काढत होते. त्यानंतर पोलिसांनी अपघातास कारणीभूत गाडीचा चालक शेखर दुबे (मुंबई) याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक पूर्ववत केली.