पणजी - गोव्यातील कोविड-19 रुग्णालयात उपचार घेऊन तब्येत सुधारल्यामुळे आज (16 एप्रिल) आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाला सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्यस्थितीत केवळ एक पॉझिटिव्ह रुग्ण मडगाव येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. गोव्यामध्ये 3 एप्रिल पर्यंत 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. ज्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते.
रुग्ण जसे बरे होत आहेत, तसे सोडून दिले जाऊन सरकारी क्वारंटाईनमध्ये ठेवले जात आहे. आज आणखी एका रुग्णाला सोडून देण्यात (डिस्चार्ज) आले आहे. आतापर्यंत सहा जणांना सोडून देण्यात आले आहे. आज दिवसभरात एकाही संभाव्य रुग्णाला होमकोरनटाईन अथवा फॅसिलीटी क्वारंटाईनमध्ये भरती करण्यात आलेले नाही. तपासणी करीता पाठविण्यात आलेल्या 116 नमुन्यांपैकी 67 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. जे सर्व निगेटिव्ह आले आहेत. तर 49 अहवालांची प्रतीक्षा आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या विलगीकरण विभागात आज तिघांना दाखल करण्यात आल्याने तेथे असलेल्या संभाव्य रुग्णांची संख्या 5 झाली आहे. तर आतापर्यंत येथे 151 जणांना दाखल करण्यात आले आहे. 29 मार्चपासून आतापर्यंत 1773 जणांना होम क्वारंटाईनमध्ये करण्यात आले आहे. फॅसिलीटी क्वारंटाईनमध्ये 202 संभाव्य रुग्ण आहेत. इस्पितळातून सोडण्यात आलेले 5 जण कांदोळी येथील सरकारी क्वारंटाईनमध्ये आहेत.
गोवा योग्य मार्गावर - आरोग्यमंत्री विश्वजीत राणे
मार्गदर्शक तत्वांचे योग्य पालक केल्यामुळे गोव्यातील कोविड-19 रुग्णांची संख्या 2 वरून 1 झाली आहे. मार्गदर्शक तत्वानुसार रुग्णांची पुनर्नमुना चाचणी करण्यात आली जी निगेटिव्ह आली आहे. डॉ. एडविन कुलासो यांच्या नेतृत्वाखाली सर्व वैद्यकीय पथक करत असलेल्या परिश्रमाने हे शक्य होत आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आम्हाला आशा आहे की, जो पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. त्याचाही अहवाल निगेटिव्ह येईल, अशी आशा आहे. एकंदरीत कोविड-19 विरोधात गोव्याची लढाई योग्य मार्गावर आहे, अशी प्रतिक्रिया गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केली आहे.