पणजी - राज्यात पर्यटक खुलेआम पणे हातात बंदूक घेऊन हौदोस घालत असल्याची घटना नुकतीच कॅलनगुट समुद्रकिनारी घडली. एका पर्यटकाने चक्क बंदूक हातात घेऊन एका हॉटेल व्यावसायिकाला धमकविले असून याप्रकरणी पोलीस बघ्याची भूमिका घेत असून या बद्दल स्थानिकांनी भीती व्यक्त केली आहे.
राज्यात एकीकडे कोविडमुळे अर्थचक्र थांबले असून अनेक हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. यातच राज्यातील अनेक पर्यटक हॉटेल व्यावसायिकांना खुलेआम पणे धमकावत आहेत. अशीच घटना शुक्रवारी राज्यात घडली. हरयाणातील दोन तरुण खुलेआम पणे समुद्रकिनारी भागात बंदूक घेऊन फिरत होते. यावेळी त्यांनी गोळीबार ही केला. स्थानिकांनी खबरदारी घेऊन वेळीच एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पिस्तुल हस्तगत केले.
कॅलनगुट किनारा गुन्हेगारी अड्डा
राज्यात सर्वाधिक गर्दी व पर्यटकांनी गजबजून जाणारा समुद्र किनारा म्हणजे कॅलनगुट. पण मागच्या काही वर्षांपासून या भागात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. त्यातच येथील पोलीस याकडे सर्रासपणे डोळेझाक करत आहेत, त्यामुळे येथील स्थानिक नागरिक व हॉटेल व्यावसायिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोवा गॅंग ऑफ वासेपुर
राज्यात वाढलेली गुन्हेगारी मुळे राज्याची ओळख आता गोवा गॅंग ऑफ वासेपुर होणार अशी टीका गोवा फॉरवर्ड चे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे, तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राज्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष लक्ष द्यावे अशी मागणी काँग्रेस नेते गिरीश चोदणकर यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्या भेटीतील फोटोवर भाष्य करताना ट्विटर द्वारे ही मागणी केली.