गोवा - राज्याप्रती आपली वचनबद्धता कायम ठेवत, गोवा'टीएमसी'ने आज आपल्या तत्कालिक कोअर समित्यांची घोषणा केली आणि सह-समन्वयकांची यादी जाहीर केली. पणजी येथील पक्ष कार्यालयात 'एआयटीसी'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुइझिन्हो फालेरो, गोवा राज्य प्रभारी कीर्ती आझाद आणि कोअर कमिटीचे समन्वयक राजेंद्र काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
यावेळी कीर्ती आझाद म्हणाले की, ‘गेल्या 5 महिन्यांत गोव्यातील जनतेने आमच्यावर केलेले अपार प्रेम आणि पाठिंबा याबद्दल आम्ही आभारी आहोत. गोव्यातील पहिल्याच निवडणुकीमध्ये आम्हाला 5 टक्क्यांपेक्षा (40 जागा ) जास्त आणि 8 टक्क्यांहुन अधिक ( टीएमसीने लढवलेल्या 26 जागा ) मते मिळवण्याची परवानगी दिल्याबद्दल आम्ही लोकांचे आभारी आहोत. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही राज्यासाठी असलेले व्हिजन पूर्ण, असे राज्य प्रभारी कीर्ती आझाद म्हणाले.
‘तुलनात्मक अभ्यासानुसार, भाजपला पहिल्या निवडणुकीत केवळ एक टक्के मते मिळवता आली होती आणि तिसऱ्या निवडणुकीत त्यांना पहिला आमदार निवडून आणण्यात यश आले. तसेच काँग्रेसला तिसऱ्या निवडणुकीत दमणमधील केवळ एक जागा जिंकता आली होती. पण, तृणमूल काँग्रेसला यापैकी बहुतेकांपेक्षा जास्त पाठिंबा मिळाला. याचा अर्थ गोव्यातील लोकांचा असा विश्वास आहे की त्यांनी जे आश्वासन दिले आहे ते पूर्ण करण्यास टीएमसी सक्षम आहे.’, असेही आझाद म्हणाले.
आझाद यांनी भाजप सरकारच्या अपयशावर प्रकाश टाकला आणि म्हणाले, ‘सरकार आपली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे आणि बहुतांश योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरल्या आहेत. लाडली लक्ष्मी आणि गृह आधार यांसारख्या योजनांचे अर्ज गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून जवळपास 32 हजार प्रलंबित अर्जांसह जमा झाले आहेत.' आपली नाराजी व्यक्त करत त्यांनी राज्य सरकारच्या अक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते म्हणाले, 'जर सरकार अटल सेतू पूलावरील खड्डे बुजवू शकत नसेल तर, लोकांचे पोट कसे भरणार, असा सवाल आझाद यांनी उपस्थित केला.
गोवा 'टीएमसी'च्या योजनांवर बोलताना आझाद यांनी स्पष्ट केले की, ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका हे आमचे सध्याचे लक्ष्य आहे आणि आम्ही मजबूत आणि संवेदनशील पद्धतीने परत उसळी घेऊ. आमचे पक्षाचे नेते स्थानिक समस्या मांडतील आणि गोव्यातील लोकांच्या समस्या मांडतील.' आम्ही गृहलक्ष्मी, युवा शक्ती आणि 'माझे घर, मालकी हक्क ' या 'टीएमसी'ने यापूर्वी जाहीर केलेल्या तीन योजनांचे पालन करू, असे राज्याचे प्रभारी कीर्ती आझाद यांनी सांगितले.