पणजी (गोवा) - महाराष्ट्रात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (chief minister Pramod Sawant) यांनी अनाधिकृत खाणीचा व्यवहार केला असून त्याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा (Tmc mp Mahua Moitra) यांनी केला. आज त्या पणजीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 6 महिन्यांत राज्यातील खाणी सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप राज्यातील खाणी सुरू केलेल्या नाहीत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राज्यात भ्रष्टाचार करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक खाणी भाडेतत्वावर चालवायला घेतल्या आहेत. जनतेच्या पैशाचा भ्रष्टाचार करून खाण विकत घेतल्याचा आरोप तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी केला असून, याची पंतप्रधानांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
म्हादइच्या पाण्यातही सेटलमेंट
पर्रीकर यांच्या निधनानंतर अपघाताने डॉ. सावंत राज्याचे मुख्यमंत्री झालेत. मात्र, मुख्यमंत्री झाल्यावर यंत्रणांना हाताशी धरून त्यांनी म्हादइ नदीचे गोव्याच्या वाट्याचे पाणी कर्नाटक राज्याला दिले असून, त्यामुळे गोवा राज्यावर अन्याय झाल्याचा आरोपही तृणमूलने केला.