पणजी - मनुष्य धर्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो, अशी आमची परंपरा सांगते. त्यात गोव्यातील धार्मिक सौहार्द सर्वांना माहीत आहे. असा सलोखा कुठेच नाही. त्यामुळे आम्हाला आमचा गोवा टिकवून ठेवावा लागेल, असे प्रतिपादन गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आज पणजीत केले.
हेही वाचा- स्टेट बँकेचे एटीएम कार्ड अधिक सुरक्षित; 'हा' केला नवा बदल
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी यांना विरोध करण्यासाठी काँग्रेसने स्थापना दिनाचे औचित्य साधून कांपाल ते आझाद मैदान अशा फेरीचे आयोजन केले होते. 'देश वाचवा - संविधान वाचवा' फेरीनंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. यामध्ये प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी आमदार धर्मा चोडणकर, प्रताप गावस, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वरद म्हार्दोळकर आदींसह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना कामत म्हणाले की, आजचे सरकार संविधानाचा अवमान करत आहे. या संविधानाने धर्माच्या आधारे कोणालाच नागरिकत्व दिले नव्हते. बेरोजगारी, विकास यासारख्या जीवन मरणाच्या प्रश्नापासून लक्ष वळवून सरकार नको त्या गोष्टींमध्ये लक्ष गुंतवून ठेवू पाहत आहे.
म्हादई मुद्द्यावर बोलताना कामत म्हणाले की, म्हादई कोणताही पक्ष अथवा एका व्यक्तीची नाही. जर ती नसेल तर गोव्याचे काय होईल याचा विचार न केलेलाच बरा. केंद्र सरकार देशाच्या विकासातील गोव्याचे योगदान नाकारू शकत नाही. गोव्यावर छोटे राज्य म्हणून सरकार दादागिरी करू शकत नाही. गोव्याचे सांप्रदायिक सौहार्द टिकविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
हेही वाचा- डिझेल प्रति लिटर १७ ते १८ पैशाने महाग; पेट्रोल दर स्थिर
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, केंद्र सरकार लोकांची विभागणी करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी देशावर लादू पाहत आहे. ज्यामध्ये केवळ उच्च वर्णीय आणि श्रीमंताना स्थान असेल. यामधून हिंदू मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. तसेच सर्वात मोठा धोका म्हणजे संवैधानिक संस्थांना भाजप सरकारमुळे धोका निर्माण झाला आहे. तसेच न्यायालयाने लोकविश्वास गमावला आहे. अशावेळी होणाऱ्या अत्याचाराविरोधात एकत्रित लढले पाहिजे.
खासदार सार्दिन म्हणाले की, सरकारला आमचा आर्थिक प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही. बेरोजगारी वाढली, जीडीपी कुठे पोहचली याकडे लक्ष नाही. परंतु, गोव्यातील जनता नेहमीच एकत्र रहिली आहे. आमच्यामध्ये कधीच भेदभाव नव्हता. हा एकोपा घेऊन आम्ही पुढे जात देशाची प्रगती साधुया. केवळ गोवाच नव्हे तर गोव्याबाहेरील लोक आमचे बांधव आहेत, अशा वेळी वाईट प्रवृत्तींचा निषेध करूया.