पणजी- चित्रपटाची भाषा बदलत असून यामुळे कलाकार आणि तंत्रज्ञ यांना अधिक संधी आहे. असे बंगाली चित्रपट निर्माता आणि कलाकार प्रोसेनजीत चॅटर्जी यांनी व्यक्त केले. 'ज्येष्ठपुत्रो' या चित्रपटाच्या निमित्ताने इफ्फिमध्ये त्यांचे रेडकार्पेटवर स्वागत करण्यात आले.
कौशिक गांगुली दिग्दर्शित ' ज्येष्ठपुत्रो' चित्रपट आज भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'इंडियन पॅनोरमा' विभागात दाखविण्यात आला. तत्पूर्वी यातील मुख्य कलाकार प्रोसेनजित चॅटर्जी आणि संकलक शुभजीत सिंह यांचे रेडकार्पेटवर स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना चॅटर्जी म्हणाले, मागील 37 वर्षांपासून चित्रपट क्षेत्रात आहे. आतापर्यंत सुमारे 347-48 चित्रपट केले. त्यानंतर रेडकार्पेटवर चालण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी कठीण परीश्रम करण्याची गरज आहे.
माझ्या या प्रवासात चित्रपटाची भाषा बदलताना पाहिली आहे, असे सांगून चॅटर्जी म्हणाले, आता ती अधिक वेगाने बदलत आहे. त्यामुळे अमूक कलाकाराला प्राधान्य मिळते असे नाही. तर चांगले कलाकार आणि तंत्रज्ञ यांना मोठी संधी आहे.
या चित्रपटाचे संकलक शुभजीत सि़ग यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.