पणजी - राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालाचे गोवा आम आदमी पक्षातर्फे स्वागत करण्यात आले आहे. गोवा आपचे संयोजक एल्वीस गोम्स यांनी ही भावना व्यक्त केली. तसेच त्यांनी केंद्र सरकार योग्य पद्धतीने या निर्णयाची अंमलबजावणी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
हेही वाचा - अयोध्येच्या ऐतिहासिक निकालानंतर मान्यवरांच्या प्रतिक्रिया..
आपच्या प्रसिद्धी पत्रकात पत्रकात गोम्स यांनी म्हटले आहे की, निकाल आला आणि राम मंदिरासंबंधीचा जो वाद होता तो संपलेला आहे. मात्र, आता देशाने शाळा-महाविद्यालयांना प्राधान्य देत पुढे जाण्याची वेळ आली आहे. तसेच देशातील पायाभूत सुविधांवर लक्ष देत ऐतिहासिक निर्णय घेणे गरजेचे आहे.
काय आहे निकाल?
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज (शनिवार) आपला निकाल जाहीर केला. यामध्ये अयोद्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असल्याचे स्पष्ट केले आहे. तर मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही पर्यायी जागा केंद्र किंवा राज्य सरकार कोणीही देऊ शकते. या निकालानुसार वादग्रस्त असलेली २.७७ एकर जागा ही केंद्र सरकार नियंत्रित ट्रस्टला मिळणार असल्याचे न्यायालयाने या निकालात स्पष्ट केले.