पणजी - शिवसेनेने गोव्यातील समस्या विचारात घेत जाहीरनामा तयार केला आहे. येथील लोकांना अजूनही पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे सरकारने नद्यांच्या राष्ट्रीयकरणाऐवजी लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. असे मत शिवसेनेच्या दक्षिण गोवा मतदारसंघाच्या उमेदवार तथा राज्यउपाध्यक्ष राखी नाईक यांनी व्यक्त केले.
शिवसेना गोवा प्रभारी खासदार संजय राऊत यांनी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा लढवण्याची घोषणा केली होती. उत्तर गोवा मतदारसंघातून शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत तर दक्षिण गोवा मतदारसंघातून उपाध्यक्ष आणि पक्ष प्रवक्त्या राखी नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, केवळ दक्षिण गोव्यातून नाईक यांनीच उमेदवारी दाखल केली. त्यामुळे मान्यताप्राप्त पक्षाकडून उमेदवारी दाखल करणाऱ्या नाईक या मतदारसंघातील एकमेव महिला उमेदवार आहेत.
निवडणूक प्रचाराविषयी बोलताना नाईक म्हणाल्या, शिवसेनेने सर्वात आधीपासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच पक्षानेही मला वर्षभरापूर्वी पक्षाच्या आदेश देत काम करण्यास सुरुवात केली आहे. तर आता आम्ही आमच्या वचननाम्यासह लोकांच्या गाठी-भेटी घेत आहेत. गोव्याशी निगडीत वचननामा असणारा आमचा पहिला पक्ष आहे. त्याचेच अनुकरण आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने केले आहे, असा टोलाही त्यांनी इतर पक्षांना लगावला.
आम्ही घरोघरी मतदारांच्या भेटी घेत असून आम्हांला उत्तर प्रतिसाद लाभत आहे, असे सांगून नाईक म्हणाल्या, आम्ही कोणावरही टीका न करता सकारात्मक पद्धतीने प्रचार करत आहेत. आम्ही दिलेली आश्वासने सत्तेत आल्यावर निश्चित पूर्ण करणार आहे. यामध्ये प्राधान्याने खाण प्रश्न सोडविण्यावर भर असेल, तसेच केंद्राच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यात येतील.
नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते सुरुवातीपासून घरोघरी प्रचार करत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यावरही त्यांनी पक्षाच्या कोणत्याही नेत्यास मतदार संघात पाचारण केलेले नाही.