पणजी - गोवा हे कोरोनामुक्त होणारे देशातील पहिले राज्य ठरले होते. शेवटचा रूग्ण आढळून 40 दिवस झाले. मात्र, आता ४० दिवसानंतर गोव्यात पुन्हा कोरोनाचे सहा रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मुंबईतून आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा तर गुजरातहून आलेल्या एका ट्रक चालकाचा समावेश आहे.
मुंबईतून आलेले हे पाचही जण कोणाच्याही संपर्कात आलेले नाहीत. त्यामुळे तूर्तास सामाजिक संसर्गाचा धोका नाही. यांची रॅपिड चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरीही त्यांचे अहवाल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी गोवा सज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. मात्र, हा विषाणू संसर्गजन्य असल्याने गोमंतकीयांनी आपली काळजी घ्यावी. यासाठी सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. दरम्यान, यापूर्वी गोव्यात 7 कोरोना रुग्ण आढळले होते. त्यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले होते.