पणजी - कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम, मतदारांचा आशीर्वाद आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेला विकास यामुळे पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे, असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज व्यक्त केले. त्यांनी रायबंदर येथे मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
यावेळी नाईक म्हणाले, मागील 25 वर्षे भाजप पणजीत जिंकत आला आहे. पर्रीकर यांनी पणजी शहराचा केलेला कायापालट यांची येथील लोकांना जाणीव आहे. त्यामुळे ही जागा आम्ही जिंकणार आणि सिद्धार्थ कुंकळ्येकर तिसऱ्यांदा पणजी विधानसभेत प्रवेश करणार हे निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रात राज्यमंत्रीपद मिळण्याची आशा -
नाईक हे भाजपचे उत्तर गोवा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून पाचव्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप जिंकणार आहे. तसेच केंद्रात भाजपचे सरकार येणार असून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील. त्यामुळे केंद्रात राज्यमंत्री पद मिळण्याची आशा आहे. कारण यापूर्वी माझ्याकडे दिलेल्या आयुषमंत्रालयाचा कारभार कशाप्रकारे आहे, हे देशाला माहित आहे. त्यामुळे नव्या सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळेल, अशी आशा नाईक यांनी व्यक्त केली.