पणजी - राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत मागच्या दोन दिवसापासून गोवा दौऱ्यावर आहेत. मागच्या दोन दिवसांत त्यांनी गोव्यातील विविध मतदारसंघाचा दौरा करून आगामी विधानसभा निवडणुक स्वबळावर लढविण्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली. त्यामुळेच भविष्यात शिवसेना २५ जगावर आपले भवितव्य अजमविण्याचा प्रयत्न करणार आहे. आज पत्रकार परिषदेत राऊत यांनी सत्ताधारी भाजपाने गोव्याची पुरती वाट लावली असून विरोधी पक्ष काँग्रेसचे आमदार फोडून भाजपा राज्य करत असल्याची टीका त्यांनी केली. सोबतच दिल्लीतील आम आदमी पक्ष व राज्याच्या राजकारणात नवखाच आलेल्या तृणमूल वरही त्यांनी सडकून टीका केली. तृणमूल पक्षाने गोयची नवी सकाळ या त्यांच्या राजकीय कॅम्पेन वर टीका करताना राऊत यांनी सांगितले की पोर्तुगीजांना गोव्यातून हाकल्यांनंतर गोव्यात रोजच नवी सकाळ होत आहे.
'५ वर्षे युतीत कुजलो'
मागची २५ वर्षे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या मदतीने महाराष्ट्र राज्यात विविध भूमिका पार पाडल्या, यात सत्ताधारी ते विरोधक असा प्रवास आहे. मात्र या प्रवासात असताना आम्हाला काही भागात आमच्या पक्षाचा विस्तार करता आला नाही. त्यामुळे या २५ वर्षात आम्ही भाजपसोबत कुजलो असून तीच परिस्थिती गोव्यातही निर्माण झाली आहे. त्यामुळे गोव्यात इतकी वर्षे आघाडी व युती करून आम्हाला काहीही साध्य झाले नाही त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना कोणत्याही पक्षासोबत युती न करता स्वबळावर २२ ते २५ जागा लढविणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोव्यातही मराठी अस्मिता -
गोवा हे महाराष्ट्र राज्याच्या जवळचे राज्य आहे, त्यामुळे येथील बहुसंख्य लोक मराठी भाषिक आहेत. त्यामुळे शिवसेनेने पुन्हा एकदा गोव्यातही मराठी अस्मितेचा प्रश्न उभा करत त्याच जोरावर आगामी विधानसभा निवडणुकीत मतांची गोळाबेरीज शिवसेना करणार आहे. गोव्यातील ४० टक्के लोक महाराष्ट्रात नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने राहतात. त्यामुळे गोवा आणि महाराष्ट्र वेगळे नसून एकच आहेत असा मजेशीर टोल राऊत यांनी लगावत गोव्यातही मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला.
गोव्यात शिवसेनेला अद्याप यश नाही -
शिवसेना गोव्यात नेहमीच अपयशी राहिली आहे. मागच्या २५ वर्षांपासून शिवसेनेचे राज्यात अस्तित्व फक्त नावापुरतेच आहे. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत शिवसेना आपले उमेदवार उभे करत आहे, मात्र नेहमीच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. विधानसभेप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेला अद्याप यश मिळाले नाही आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना २२ ते २५ जागा लढवून किती विजय मिळवितो ते पाहणेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.