पणजी (गोवा) - महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही शिवसेना भाजपाचा विजयी रथ रोखणार असण्याचा इशारा शिवसेनेच्यावतीने देण्यात आला आहे. नुकतेच फडणवीस गोवा दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा गोव्यात भाजपाचा विजयाचा नारा दिला होता. त्याला शिवसेनेने थेट आव्हानच दिले आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपा वादाची मशाल गोव्यातील विधानसभा निवडणुकीत पेटतच राहणार असल्याचे चित्र दिसून येते. राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गोव्याचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी राज्यात पुन्हा एकदा भाजपाचे पूर्ण बहुमतातील सरकार येणार असल्याचा दावा केला. फडणवीसांच्या या दाव्याला शिवसेनेकडून डिवचवण्यात आले. राज्यातील शिवसेनेचे नेते जितेश कामत यांनी भाजपाच्या या दाव्यावर ट्विट करून येथेही शिवसेनाच रोखणार असा सूचक इशारा भाजपला दिला आहे.
शिवसेना राज्यात २५ जागा लढविणार
भाजपाचे प्राबल्य असणाऱ्या २५ मतदारसंघात शिवसेना निवडणूक लढणार असून पुन्हा एकदा महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही शिवसेना भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे, शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत म्हणाले.
शिवसेना फोडणार भाजपाची मराठी मते
मागच्या कित्येक वर्षात शिवसेनेला हवे तसे यश राज्यात मिळाले नाही. मात्र महाराष्ट्र गोमंतक पार्टी व इतर प्रादेशिक पक्षांशी युती करून मराठी मतांचे ध्रुवीकरण करून त्यांचा उमेदवार निवडून आणण्यात व प्रतिस्पर्धी उमेदवार पाडण्यात शिवसेनेचे विशेष योगदान आहे. राज्यातील मराठी त्यातही बाळासाहेब ठाकरे व शिवसेना यांच्या विचारांना मानणारा एक गट गोव्यातही अस्तित्वात आहे. त्यांची मते आपल्या पदरात पाडून घेऊन आपले अस्तित्व राखण्यात मागच्या काही वर्षात शिवसेनेला यश आले होते.
राज्यात २०१९ ला भाजपाविरोधी निवडणूक
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा इतर राज्यात एकत्र लढली होती. मात्र गोव्यात शिवसेनेने भाजपा विरोधात उमेदवार उभे करून थेट आव्हानच दिले होते.