पणजी - केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या पत्र सूचना विभागाकडून शुक्रवारी धेंपे कला व विज्ञान महाविद्यालय, पणजी, गोवा येथे महिला सबलीकरण विषयावर व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. लेफ्टनंट कमांडर मेघा शर्मा यांनी सुरुवातीला मनोगत व्यक्त केले.
नौदल अधिकारी म्हणून झालेला आजवरचा प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसामोर मांडला. नौदलाने वैयक्तिक पातळीवर वृद्धिंगत होण्यास मदत केली, असे सांगताना त्या म्हणाल्या, नौदल सेवेमध्ये महिला किंवा पुरुष म्हणून न वागवता केवळ अधिकारी म्हणूनच समोर उभे केले जाते. नौदलामध्ये महिलांना अनेक संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. नौकायन, स्केटिंग, गिर्यारोहण अशा अनेक प्रकारच्या प्रशिक्षणाचा लाभ त्या या सेवेत घेऊ शकल्याचे देखील त्यांनी सांगितले. असंख्य क्षमता व संधी आपल्याजवळ आहेत, आपल्याला दिशा शोधण्याची गरज आहे, असे शर्मा यांनी यावेळी अधोरेखित केले.
व्याख्यानानंतर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उद्योजिका लक्ष्मी कुंकळ्ळीकर, वकील शांती मारिया फोन्सेका, वरिष्ठ व्यवस्थापक भाव्या दुआ, सहायक संपादक गौरी मळकरणेकर यांचा सहभाग होता. लक्ष्मी कुंकळ्ळीकर यांनी उद्योजक होणे म्हणजे आपला ‘कंफर्ट झोन’ (आरामदायी जागा) सोडणे, याची जाणीव यावेळी करून दिली. लक्ष्य केंद्रीत करून काम करणे, गोष्टींचा प्रधान्यक्रम ठरवता येणे, हे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही आणि आपल्याला बदलावे लागणार, अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. वकील शांती मारिया फोन्सेका यांनी आपले विचार मांडताना, अनेक भेदभावांना सामोरे गेले असतानाही पुन्हा स्त्री जन्म घ्यायला आवडेल, असे सांगितले. कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून न जाता वेगवेगळ्या टप्प्यावर पुन्हा-पुन्हा आपल्याला सुरुवात करावी लागते, ते साहजिक असते आणि अंतिम निर्णय हा स्वत:चाच असायला हवा, याची जाणीव उपस्थित मुलामुलींना करून दिली.
भाव्या दुआ यांनी कठोर परिश्रम करा आणि मोठी स्वप्ने पहा, असे आवाहन उपस्थितांना केले. जे तुम्हाला वाटते, ते जगालाही दाखवून द्यावे लागेल, असेही त्या म्हणाल्या. निर्णय घ्यायला घाबरू नका, घेतलेल्या निर्णयानुसार केलेली प्रत्यक्ष कृती याशिवाय चूक-बरोबर कळणार नाही, अशी शिकवण आपल्या आईकडून मिळाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
गौरी मळकरणेकर यांनी सांख्यिकीचा आधार घेत स्त्री शिक्षणाचे वास्तव लक्षात आणून दिले. पदव्युत्तर शिक्षणात गोव्यातील स्त्रियांचा टक्का 61 इतका आहे, परंतु पीएचडी स्तरावर हा टक्का केवळ 25 आहे. तसेच प्राध्यापक म्हणून करियर करणाऱ्या स्त्रिया देखील कमी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार म्हणून काम करताना ग्रामीण भागात स्त्री शिक्षणाची गरज ठळकपणे जाणवते, असे त्यांनी आवर्जून सांगितले. पूर्वीपेक्षा सध्याचे वातावरण अधिक पोषक असून या सकारात्मक परिस्थितीचा आपण फायदा घ्यायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.
या चर्चासत्राचे सूत्रसंचालन आकाशवाणीच्या ओरिना वाझ यांनी केले. तर, पत्र सूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक एरमेलिंडा डायस यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. उपसंचालक विनोदकुमार डी. व्ही. यांनी आभारप्रदर्शन केले.