पणजी - महात्मा ज्योतीराव फुले यांनी बहिष्कृत, स्त्रिया, शुद्रातीशुद्र यांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. तर सध्या ज्यांच्या नावे शिक्षक दिन साजरा केला जातो, त्यांना तशी पार्श्वभूमी नाही. त्यामुळे महात्मा फुले यांचा स्मृतीदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करावा, अशी आमची अनेक वर्षांची मागणी आहे, असे मत लोकशाहीर संभाजी भगत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.
गोव्याची राजधानी पणजीमध्ये सध्या सुवर्णमहोत्सवी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. यामध्ये भगत यांनी अभिनय केलेल्या 'तुझ्या आयला' हा चित्रपट दाखविण्यात आला. त्यासाठी ते गोव्यात आले आहेत. महाराष्ट्रात 28 नोव्हेंबर हा महात्मा फुले यांचा स्मृती दिन 'शिक्षक दिन' म्हणून सत्यशोधक विद्यार्थी संघटनेबरोबरच काही संघटनांकडून साजरा केला जातो. तसेच तो सरकारदरबारी मान्य करत साजरा करावा, अशी मागणी केली जाते. यामध्ये संभाजी भगतही आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांचे मत जणून घेण्याचा प्रयत्न केला.
भगत म्हणाले, ही मागणी आम्ही सुरुवातीपासून करत आहोत. कारण या देशात पहिल्यांदा स्त्रीया आणि तळागाळातील लोक यांच्या शिक्षणासाठी म. फुले यांनी केलेल्या कार्याला तोड नाही. त्याला पुराव्याची गरज नाही. त्यामुळे आमची अशी मागणी आहे.
या देशात हजारो वर्षांपासून ज्ञान आणि प्रतिष्ठा यांपासून बहिष्कृत केलेला समाज संख्येने मोठा आहे, असे भगत म्हणाले. आधुनिक काळात म.फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांनी मोठे कार्य केले आहे. म. फुले यांनी शुद्रातीशुद्रांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांना शिकविण्याचे काम केले. तर सध्या ज्यांच्या नावाने हा दिन साजरा केला जातो, त्यांना अशी पार्श्वभूमी नाही. मला त्यांच्यावर टीका करायची नाही. ज्यांना त्यांच्या विषय अधिक माहिती हवी, त्यांनी त्यांचा इतिहास वाचावा.
फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाने सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, प्रत्यक्ष सत्ता मिळाल्यानंतर त्यादृष्टीने काहीच केले जात नाही असे का? असे विचारले असता भगत म्हणाले, सत्ता प्राप्त करण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव वापरले जाते. कारण, आपल्यावर ब्राह्मणी विचारांचा पगडा अधिक आहे. राजकीय पक्ष काहीही म्हणत असले तरी आपल्या राजकर्त्या वर्गामध्ये आवश्यक असलेल्या जाणीवा आणि नेणीवा ज्या प्रमाणात विकसित व्हायला हव्या होत्या, तशा न झाल्याने हा राजकीय तमाशा होत असतो, असे भगत म्हणाले.
हेही वाचा - मुलांच्या मनोरंजनासाठी ईफ्फी परिसरात आकर्षक 'चिल्ड्रन व्हिलेज'