पणजी - गोवा विधानसभेचे सभापती म्हणून भाजपच्या राजेश पाटणेकर यांची आज निवड करण्यात आली. एकदिवसीय विशेष अधिवेशनात मांडण्यात आलेला ठराव त्यांनी २२ विरुद्ध १६ मतांनी जिंकला. मागील ४७ वर्षे सतत विधानसभा सभापती निवडणूक जिंकणाऱ्या काँग्रेसचा पहिल्यांदाच पराभव झाला आहे.
प्रभारी सभापती मायकल लोबो यांनी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात करत प्रस्ताव वाचून दाखवले. सभापतीपदासाठी भाजपच्यावतीने राजेश पाटणेकर यांनी तर, काँग्रेसतर्फे प्रतापसिंह राणे यांनी उमेदवारी दाखल केली होती. निकालासाठी उभे राहुन समर्थन देण्याचे ठरल्यानंतर पाटणेकर यांना सत्ताधारी भाजप, घटकपक्ष गोवा फॉरवर्ड आणि ३ अपक्षांसह २२ आमदारांनी समर्थन दिले. तर, १६ आमदारांनी उभे राहून विरोध दर्शविला.
मगोचा विरोध तर राष्ट्रवादीचे आमदार गैरहजर
पोटनिवडणूक लढविण्यावरुन महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला होते. यामुळे मगो नेते सुदिन ढवळीकर यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात आली. मगोने सरकारला दिलेले समर्थनाचे पत्र अद्याप मागे घेतले नसल्याने सभापती निवडणुकीत ढवळीकर कोणाच्या बाजूने मतदान करतात याची सर्वानाच उत्सुकता होती. ढवळीकर यांनी भाजप उमेदवार पाटणेकर यांना विरोध दर्शवला. मात्र, निवडीनंतर त्यांचे अभिनंदन केले. सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार असलेले चर्चिल आलेमाव मतदानावेळी गैरहजर होते.