पणजी - गोव्यात तब्बल 39 वर्षांनंतर शुक्रवारी उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सकाळपासून घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. दरम्यान या पूरपरिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आढावा घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी बातचीत करून राज्यातील परिस्थितीची विचारपूस करून केंद्राकडून सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
या पुराचा फटका राज्यातील पेडणे, बारदेश, सत्तरी, बिचोली आणि सांगे तालुक्याला बसला आहे. पुरात 2 कोटी 55 लाखांचे नुकसान झाले असून 832 हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन शेतीचे नुकसान झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
1982 नंतरचा सर्वात मोठा महापूर
शुक्रवारी आलेल्या महापुरामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, घाटामध्ये दरडी कोसळल्या, अनेक ठिकाणी पडझड झाली, गावामध्ये आणि लोकांच्या घरामध्ये पाण्याने शिरकाव केला. मुके प्राणी वाहून गेले, शेती-फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याविषयी माहिती देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, 1982 नंतरचा मोठा पूर असून याचा फटका राज्याला बसला आहे.
धारबांदोडा तालुक्यात एका मृत्यूची नोंद
पुरामुळे धारबांदोडा तालुक्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केले मदतीचे आवाहन
पुरामुळे जनतेचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांचे जनजीवन सुरळीत करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, श्रीमंत लोक, कॉर्पोरेट कंपन्यांनीही मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 76 जणांचा मृत्यू -
महाराष्ट्रात मागील तीन दिवसांपासून सर्वदूर मुसळधार पाऊस पडला. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे, तर काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 59 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. तरी अद्याप या भागात बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत पूरग्रस्त भागातून सुमारे 90 हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. तर या दरम्यान 75 जनावरांचाही मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचे पुनर्वसन करू - मुख्यमंत्री