पणजी - गोव्यातील आमदार बागेत फिरल्यासारखे फिरतात, अशा आमदारांना एकत्रित ठेवून सरकार टिकवणे कठीण आहे. अमेरिकेत लग्न टीकत नाहीत आणि गोव्यात आमदारांचा पक्ष टीकत नाही. अशा स्थितीत सरकार आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भाजप उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पणजीत केले. भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.
पणजी पोटनिवडणुकितील भाजप उमेदवार कुंकळ्येकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर, गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर आदींसह भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या विकासासाठी केंद्रीय मंत्रीपदाचा त्याग केला. त्यांनी प्रत्येक निवडणुकीत गोव्याच्या विकासाला दिशा दिली. त्यांच्यासारखा दुरदृष्टी असलेल नेता गोव्याने देशाला दिला. गोव्याचा विकास झाला तो ढवळीकर यांच्यामुळे नव्हे तर पर्रीकर यांच्यामुळे त्यामुळे जल आणि वायू प्रदषणातून गोव्याला मुक्त करणे हीच त्यांना श्रद्धांजली असेल. त्यामुळे त्यांच्या नावाने सरकारने असा उपक्रम राबविणारी योजना बनवावी असेही ते म्हणाले. तर काँग्रेस उमेदवार बाबूश मोन्सेरात यांच्यावरही गडकरींनी टिका केली. तर गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांनी पर्रीकर यांच्या पश्चात भाजप उमेदवाराविरोधात निवडणूक लढविणे दुर्भाग्य आहे. शिवाय त्यांना मत म्हणजे काँग्रेसला देण्यासारखे आहे. भाजप उमेदवारांचा पराभव करणे हाच त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना त्यांची जागा दाखवण्याची हीच वेळ आहे, असे म्हणत काँग्रेसवरही निशाना साधला.
यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री सावंत बोलताना म्हणाले, आम्ही सरकारी आणि बिगर सरकारी माध्यमातून रोजगार निर्मिती करणार आहोत. तसेच पुढील २० वर्षात आवश्यक असणारी पायाभूत सुविधांची उभारणी आत्ताच करण्यात येत आहे. कारण मानवी विकास हाच सरकारचा उद्देश आहे असेही ते म्हणाले.