पणजी - राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले आहे. गोव्यात मान्सून यापूर्वीच दाखल झाला असून, वेधशाळेने मान्सून सक्रीय झाल्याची घोषणा केली. अशातच आज पुन्हा वेधशाळेने पुढील चार दिवसांत गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मान्सून दाखल झाला असला तरीही म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. मागील २४ तासांत केवळ ८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर १ जूनपासून आतापर्यंत ३४३.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी साडेआठ वाजता हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ९८ टक्के नोंदवले गेले. तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. अरबी समुद्र खवळलेला असल्याने गोवा आणि कोकण किनारपट्टी भागातील मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
मान्सून जरी आवश्यक प्रमाणात सक्रीय झाला नसला तरीही आतापर्यंत झालेल्या पावसाने जमिनीत ओलावा निर्माण केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीकामांना सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तर लावणीला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी यंत्राचीही मदत घेतली जात आहे. मात्र, डोंगराळ भागातील शेतजमीन लागवडीसाठी अद्याप मुबलक प्रमाणात पाऊस झालेला नसल्याने तेथील शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षेत आहेत.