पणजी - शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नियोजित बायंगिणी कचरा प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. मागील दोन वर्ष सरकारने यासाठी काहीच काम केलेले नाही. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणार, असा इशारा पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी दिला.
पणजी महापालिकेतील आपल्य दालनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महापौर मडकईकर म्हणाले, की पणजीत कचऱ्याची समस्या वाढत असल्याने पालिका आयुक्तांनी १६ मे पासून निवासी इमारती आणि हॉटेलचा कचरा उचलणार नाही, असे परिपत्रक काढले होते. त्यामुळे शहरातील व्यापारी आणि रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. परंतु, असे काही होणार नाही. कचरा उचलणे सुरूच राहणार आहे. कचरा उचलण्यासाठी आयुक्तांनी कामगार देणे बंद केले. तरीही खासगी कामगार वापरून कचरा उचलला जाईल. पणजी महपालिकेजवळ स्वतः चा कचरा प्रकल्प नसल्याने कचरा विल्हेवाट कशी लावावी याविषयी समस्या निर्माण होत आहे. बायंगिणी प्रकल्प मंजूर असूनही सरकारने यासाठी मागच्या दोन वर्षात एकही रूपया खर्च केलेला नाही. हा प्रकल्प वेळीच पूर्ण केला नाही तर रस्त्यावर उतरण्यास तयार आहे, असे ते म्हणाले.
रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांविषयी बोलताना मडकईकर म्हणाले, पणजी महापालिका क्षेत्रातील मान्सून पूर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण केली जातील. शहरातील बहुतांश रस्त्यात असलेले खड्डे बुझविण्यात आले असून जर कुठे खड्डे दिसले तर नागरिकांनी निदर्शनास आणून द्यावे.
पणजी स्मार्टसिटी प्रकल्पासाठी सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहेत. परंतु, यासाठीचे नियोजन करणाऱ्या समितीत लोकनियुक्त प्रतिनिधींना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे अधिकारी कधी कोणता निर्णय घेतात हे समजत नाही, असा आरोपही मडकईकर यांनी केला.