म्हापसा/गोवा - एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करून घरात कोंबून ठेवलेल्या नवीन पटेल नावाच्या व्यापाऱ्यांची पोलिसांनी अवघ्या 24 तासात गोवा वेल्हा येथून सुटका केली. बुधवारी नवीन पटेल यांचे त्यांच्याच कामगाराच्या भावाने पैशाच्या हव्यासापोटी आपल्या साथीदारांच्या मदतीने अपहरण केले होते. अखेर पोलिसांनी कारवाई करत गुरुवारी पटेल यांची सुटका करून सर्व अपहरणकर्त्यांना गजाआड केले.
एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी थिवीम येथून नवीन पटेल या व्यावसायिकाचे पिस्तूलाचा धाक दाखवून बुधवारी अपहरण करण्यात आले होते, दरम्यान आरोपींनी रात्री साडे नऊ वाजता एक कोटी रुपये खंडणीची मागणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
कामगाराच्या भावाने आखला अपहरणाचा डाव -
नवीन पटेल आणि त्याच्या भावाचा प्लायवूडचा व्यवसाय आहे आणि त्यांच्याकडे अफाट पैसा आहे, अशी माहिती पटेल यांच्या दुकानात काम करणाऱ्या बंगलूरु येथील एका कामगाराने आपल्या भावाला सांगितली होती. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात हा कामगार आपल्या गावी गेला होता. तेव्हाच पटेल यांच्या अपहरणाचा कट शिजविण्यात आला आला. त्यानुसार कामगाराच्या भावाने आपल्या गोवा , महाराष्ट्र आणि बिहार येथील साथीदारांच्या मदतीने हे अपहरण केल्याचे प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाले आहे.
पिस्तूलाचा धाक दाखवून अपहरण -
बुधवारी नवीन पटेल हा आपल्या थिविम येथील दुकानावर होता, तेव्हा क्रेटा या आलिशान गाडीतून आलेल्या आरोपींनी पटेल यांना पिस्तूलाचा धाक दाखवून गोवा वेल्हा येथे नेऊन कोंडून ठेवले. दरम्यान आरोपींनी पटेल यांच्या भावाला फोन करून त्यांच्या जिवंत सुटकेसाठी 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्याचक्षणी पटेल यांच्या भावाने कोळवाल पोलिसात धाव घेत अपहरणाची माहिती दिली. त्यावेळी पोलिसांनी तपास करत मध्यरात्री 1 च्या सुमारास एका संशयिताला ताब्यात घेतले.
गुरुवारी नवीन पटेल यांची सुटका -
संशयित आरोपीच्या माहितीनुसार पोलिसांनी आगशी पोलिसांच्या मदतीने गोवा वेल्हा येथे पटेल यांना कोंडून ठेवलेल्या घरावर छापा टाकून पटेल यांची सुटका केली. दरम्यान सर्व अपहरण कर्त्याना गजाआड करून त्यांनी वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.
24 तासांत आरोपींच्या आवळल्या मुसक्या -
पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवाल पोलीस निरीक्षक विजय चोदणकर यांच्यासह म्हापसा आणि तिसवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपींना 24 तासाच्या आत गजाआड केले.
पुन्हा एकदा गोव्यात गुन्हेगारांनी डोकं वर काढले असून मागच्याच आठवड्यात बलात्काराच्या दोन घटनांनी गोवा हादरले होते, त्याचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटले होते. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृह खात्याचे प्रमुख असलेले डॉ. प्रमोद सावंत यावेळी वाढत्या गुन्हेगारी आणि बेजबाबदार वक्तव्याबद्दल विरोधकासह राज्यातील जनतेत टीकेचे धनी ठरले. या घटनेमुळे राज्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी डोके वर काढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.