पणजी (गोवा) - येथील गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालय परिसरातून शुक्रवारी सायंकाळी एका महिन्याच्या मुलाचे अपहरण झाले होते. याप्रकारानंतर अपहरण झालेल्या एका महिन्याच्या मुलाची सुटका करण्यात गोवा पोलिसांना शनिवारी यश आले. पोलिसांनी अपहरण करणाऱ्या त्या महिलेसह बाळाला ताब्यात घेतले आहे.
![kidnapped child searched by police goa](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sindhudurg-4-goa-sindhudurg-10022_12062021210612_1206f_1623512172_759.jpg)
बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयाच्या आवारातून एक महिन्याच्या बाळाचे अपहरण केलेली संशयित महिला ही अस्नोड्यापर्यंत बाळ घेऊन गेल्याची माहिती सीसीटीव्ही कॅमेरातून पोलिसांना मिळाली होती. ती महिला डिचोली परिसरातील असण्याच्या संशयावरून पोलीस पथके त्या महिलेचा शोध घेत होती. मात्र, नंतर सालेली या दुर्गम भागात ते मूल नेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत मूल पळवणारी महिला आणि बाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लहान मुले पळविणाऱ्या टोळीशी या महिलेचा संबंध असण्याची शक्यता कमी आहे. तिने गोमेकॉ रुग्णालय आवारातून बाळ घेऊन पसार झाल्यानंतर अस्नोडापर्यंत मोटारसायकल पायलट, प्रवासी बस, तसेच एका दुचाकीकडे लिफ्ट घेऊन करासवाडापर्यंत प्रवास केला. एखादी टोळी या प्रकरणात असती तर तिने ते बाळ घेऊन प्रवास केला नसता. या महिलेच्या वर्णनावरून ती सुशिक्षित दिसते. त्यामुळे हे बाळ घेऊन पसार होण्यामागील हेतू काय असू शकतो? याचाही तपास केला गेला. ही घटना घडली व त्यानंतर तपास सुरू होऊन तिचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामार्फत शोध घेण्यात बराच वेळ गेला. शुक्रवारी संध्याकाळी ती करासवाडा येथे बाळासोबत दिसली होती. त्यामुळे पोलिसांनी रात्रभर करासवाडा व त्या आजाबाजूचा परिसर पिंजून काढला. त्यानंतर अस्नोडा येथे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ती दिसली होती. मात्र, त्यानंतर ती कोठे गेली याची माहिती पोलिसांना मिळाली नसल्याने तपासकामाची गती काहीशी मंदावली होती तिला आज दुपारनंतर खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर गती आली.
पोलिसांना मिळाली माहिती -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाचे अपहरण करून तिने गोमेकॉ इस्पितळाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर नेहमीपणे उभ्या असलेल्या मोटारसायकल पायलटला माशेल येथे जायचे आहे, असे सांगितले. चालकाने तिला ३०० रुपये लागतील, असे सांगितल्यावर इतके पैसे माझ्याकडे नाहीत. त्यामुळे पणजी बसस्थानकापर्यंत पोहोचविण्यास सांगितले. बसस्थानकावर पोहोचल्यावर तिने पुन्हा मोटारसायकल पायलटने म्हापसा येथे जाण्यास निघाली. मात्र, पैसे कमी असल्याने पर्वरी येथेच सोडण्यास सांगितले. तेथून ती बसने म्हापसा येथील बसस्थानकाजवळ असलेल्या सर्कलवर उतरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. त्यापुढील तपास पोलिसांनी खबऱ्यांच्या आधारे केला.
महिलेशी ओळख करून पळविले मुलाला -
मूळ ओडिशा येथील महिला एक महिन्याच्या मुलाला घेऊन पोलिओ डोस देण्यासाठी गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात आली होती. येथे आवारात असलेल्या नेस कॅफे आऊटलेटच्या ठिकाणी ती मुलाला घेऊन उभी होती. ती मुलाला घेऊन एकटीच असल्याचे हेरून संशयित महिलेने तिला लक्ष्य केले. तिच्याशी तिने ओळख केली. बालकाच्या आईला नेस कॅफे आऊटलेटमध्ये खाद्यपदार्थ आणण्यास या महिलेने पाठवले व मुलाला तोपर्यंत सांभाळते, असे सांगितले. या अनोळखी महिलेशी तिची ओळख नसताना बालकाला या महिलेकडे देऊन मुलाची आई खाद्यपदार्थ आणण्यास गेली. काही वेळाने परतली असता ती अनोळखी महिला दिसली नाही. त्यामुळे तिने या परिसरात मुलासह तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. या मुलाच्या आईने आरडाओरड केल्यावर लोक जमा झाले व या घटनेची माहिती आगशी पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी त्या महिलेचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले होते -
दरम्यान, या महिलेच्या शोधासाठी गोवा पोलिसांनी राज्यात शोधकार्य सुरू केले आहे. विविध पथके गोव्याच्या विविध भागात दाखल करण्यात आली होती. नाकाबंदी करतानाच पोलिसांनी त्या महिलेचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले होते. या फुटेजमध्ये ही महिला या मुलाला एका स्कुटर स्वाराच्या मागे बसून पळवून नेत असल्याचे दिसत होते. अखेर गोवा पोलीस या मुलाचा शोध घेत होते त्याला यश आले आहे.