पणजी - महिला साहित्य संमेलनात गोमंतकीय महिलांच्या जीवनशैली वर प्रकाशझोत टाकण्यात आला. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाचे उद्घाटन कवयित्री छाया महाजन व मराठी साहित्य अकादमीचे अध्यक्ष प्रा अनिल सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. येथील मिनेझिस ब्रागांजा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या महिला संमेलनात गोमंतकातील अनेक कवयित्री सहभागी होऊन त्यांनी आपल्या कवितांचे वाचन केले.
गोमंतकातील ग्रामीण भागात धीललो आणि धालोत्सव साजरा करताना मराठी साहित्याचा आधार घेतला जातो. येथील जीवनशैलीवर साहित्याचा प्रभाव दिसून येत असल्याचे कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा पौर्णिमा केरकर यांनी सांगितले.
काव्यातून महिलांच्या जीवनशैलीवर प्रकाशझोत -
प्रा पौर्णिमा केरकर यांच्या संकल्पनेतून लोकरंग हा कार्यक्रम महिलांनी सादर केला. यात गोमंतकातील महिलांच्या जीवनशैलीवर काव्याच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले होते. यात गोमंतकातील महिला आणि तिचा जीवनप्रवास उलगडण्यात आला होता.
मराठी साहित्य दर्जेदार करणे गरजेचे आहे - छाया महाजन
सध्या वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. मराठी भाषा वाचविण्यासाठी किशोरवयीन मुलांनी मराठी साहित्य वाचणे खूप गरजेचे असल्याचे या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष प्रा छाया महाजन यांनी सांगितले.